News Flash

स्मशानभूमीत गैरसोय

सानपाडा येथील काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

सानपाडा येथील काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

स्मशानभूमी व्हिजन अंतर्गत विविध स्मशानभूमींची दुरुस्ती नवी मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. सानपाडा सेक्टर ५ येथील स्मशानभूमीचेदेखील अंतर्गत काम हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अंत्यविधी करताना अडचणी निर्माण होत असल्याने या स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

सानपाडा सेक्टर ५ येथील स्मशानभूमीचा सानपाडा गाव तसेच सोसायटी परिसरातील जवळजवळ सर्वच सेक्टरमधील नागरिक अंत्यविधीसाठी वापर करतात. मात्र या स्मशानभूमीची दुरवस्था झाल्यामुळे स्थानिक नगरसेविकेच्या पाठपुराव्यामुळे या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम होती घेण्यात आले आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात अंत्यविधीसाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे आणि अस्ताव्यस्त पडलेल्या बांधकाम साहित्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. अपुरी जागा त्यात सुरू असलेले काम यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

खर्चाचा उल्लेख का नाही?

सानपाडा सेक्टर ५ येथील स्मशानभूमीचे काम २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून काम पूर्ण होण्याचा कालावधी २३ डिसेंबर २०१७ पर्यंत देण्यात आला आहे. या कामासाठी ८० लाख रुपये खर्च होणार आहे. मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कारण संबंधित ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी लावलेल्या फलकावर कामाचे नाव, मुदत याची तारीख टाकलेली असून कामासाठी किती खर्च होणार आहे, याचा उल्लेख मात्र टाळला आहे.

संध्याकाळी कर्मचारी उपलब्ध करावेत

या स्मशानभूमीत महापालिकेच्या वतीने अंत्यविधीसाठी ठेकेदाराचे २ कर्मचारी ठेवले आहेत. मात्र रात्रीच्या वेळी येथे ठेकेदाराची माणसे उपलब्ध नसतात. त्यामुळे काही नागरिक तुर्भे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जातात. त्यामुळे या ठिकाणी अंत्यविधीसाठी संध्याकाळच्या वेळीही अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.

सानपाडा येथील स्मशानभूमीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी अडचण येत आहे. तसेच बसण्यासाठी व्यवस्थादेखील नसल्याने हे काम वेळेत काम पूर्ण झाल्यास नागरिकांची गैरसोय थांबणार आहे.   -कमलाकर दळवी, रहिवासी, सानपाडा.

सानपाडा स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने अधिकाधिक चांगल्या सोयींसाठी दुरुस्तीचे हे काम हाती घेण्यात आलेले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अंत्यविधीसाठी अधिकाधिक चांगल्या सोयी उपलब्ध होणार आहेत. शिवाय हे काम मुदतीच्या आधी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  -कोमल वास्कर, नगरसेविका, सानपाडा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:17 am

Web Title: lack of basic infrastructure in navi mumbai graveyard
Next Stories
1 क्रीडासंकुलांचा खेळखंडोबा
2 घाऊकमध्ये स्वस्ताई; किरकोळीत लूट
3 तुभ्रेतील रस्ते गॅरेजचालकांकडून गिळंकृत
Just Now!
X