News Flash

नवी मुंबईची स्वच्छतेत पिछाडी

पहिल्या तीन क्रमांकांत येण्याची संधी हुकली

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पहिल्या तीन क्रमांकांत येण्याची संधी हुकली

केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनात सर्वोत्तम ठरली असली, तरी स्वच्छतेबाबत हे शहर अद्याप पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. इंदौर, भोपाळ आणि चंदीगड या तीन शहरांना पहिले तीन क्रमांक देऊन देशातील इतर शहरांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यातून सरकारने सर्व शहरांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे, पण या स्वच्छ शहरांत नवी मुंबईचा क्रमांक हुकला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत यंदा चार हजार २०३ शहरांचे स्वच्छ शहर सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी ही शहरे गेले वर्षभर विविध उपाययोजना करत होती. २०१६ च्या सर्वेक्षणात देशातील ४४० शहरांनी भाग घेतला होता. त्यामुळे त्यांचे सर्वेक्षण लवकर होऊन निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर करण्यात आला होता. त्यात नवी मुंबईने स्वच्छ शहरांच्या यादीत आठवा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे यंदा पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र कामाला लागले होते. विविध उपाययोजनांबरोबरच नवीन शौचालये, रंगरंगोटी, जाहिरातबाजी यावर दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली होती. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत भाग घेणाऱ्या शहरांची संख्या वाढल्याने हा निकाल लागण्यास मे महिना उजाडला, मात्र यात संपूर्ण देशातील चार हजार शहरांमध्ये मध्य प्रदेशमधील इंदूर व भोपाळ या शहरांना पहिला व दुसरा क्रमांक मिळाला, तर चंदीगडसारख्या सुनियोजित शहराला तिसरा क्रमांक देण्यात आला. यात नवी मुंबई शहर कुठेच नाही.

चांगले नियोजन करणाऱ्या शहरांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले आहे. यात नवी मुंबईला घनकचरा व्यवस्थापनात देशात अव्वल स्थान जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन हे एक-दोन वर्षांतील उपाययोजना नसून गेली १५ वर्षे शास्त्रीय पद्धतीने ही प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे देशात या प्रकल्पाचे यापूर्वीही कौतुक केले गेले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात त्याला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, मात्र स्वच्छ शहराचा पहिला पुरस्कार घेण्यासाठी झटणाऱ्या पालिका प्रशासनाचा यामुळे हिरमोड झाला आहे.

मलनिस्सारणाचा अभाव

शहर पहिल्या तीन शहरांच्या पंक्तीत न बसण्याचे कारण ग्रामीण व झोपडपट्टी भागांत अद्यापही न पोहचलेली मलनिस्सारण योजना हे आहे. आजही कचराकुंडीबाहेर कचरा साचलेला दिसत असून ते नक्कीच नवी मुंबईकरांसाठी भूषणावह नाही, अशी चर्चा आहे. केवळ सर्वेक्षणाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या उपाययोजना आता अडगळीत पडलेल्या असून पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची पकड सैल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबत हे शहर अजूनही मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिंडीतून डेंग्यूविषयी जनजागृती

राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दिंडी काढण्यात आली. ही वारकरी दिंडी घणसोली, तळवली, गोठिवली, रबाळे भागातून काढण्यात आली होती. घणसोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून या दिंडीला सुरुवात झाली. घणसोलीतील गावदेवी चौक, घणसोली गाव, तळवली, गोठिवली या मार्गाने राबाळे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत दिंडी काढण्यात आली. या वारकरी दिंडीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य साहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासह डास-अळीनाशक फवारणी कामगार व तांत्रिक पर्यवेक्षक मोठय़ा संख्येने सहभागी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:16 am

Web Title: lack of cleanliness in navi mumbai 2
Next Stories
1 शीव-पनवेल मार्ग समस्यांच्या गर्तेत
2 सीवूड्स स्थानकाच्या पश्चिमेस पार्किंगवर बंदी
3 पनवेलच्या समस्यांसंदर्भात राज ठाकरेंकडे गाऱ्हाणे
Just Now!
X