वर्गीकरण करण्याचे मॉलला आदेश

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटय़ांवर कारवाई होत असताना मोठय़ा मॉलमध्ये मात्र या संदर्भातील नियम पायदळी तुडवले जात आहेत. अशा मॉलविरोधातही पालिकेने आता पावले उचलली असून वर्गीकरण न करणाऱ्या मॉलना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यानंकरही वर्गीकरण न करणाऱ्या मॉलवर कारवाई करण्यात येत आहे. वाशी येथील रघुलीला मॉलचा कचरा वर्गीकरण न करता जवळच्या भूखंडावर टाकण्यात येत होता. गुरुवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा कचरा उचलून मॉलच्या प्रवेद्वारावर आणून टाकला. मॉलच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतरच पालिकेने कचरा उचलला.

केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या आदेशानुसार स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार कचरा निर्माण होण्याच्या ठिकाणीच त्याचे वर्गीकरण केले जाणे, जिथे १०० किलोपेक्षा जास्त कचरा गोळा होतो तिथे आवारातच सेंद्रिय अथवा जैविक पद्धतीने प्रक्रिया करणे नवी मुंबई महापालिकेने बंधनकारक केले आहे. तरीही शहरातील काही मॉल कचरा उघडय़ावर टाकत आहेत. अशा मॉलविरोधात आता पालिकेने पावले उचलली आहेत.

शहरातील विविध मॉल वाशी रेल्वे स्थानकाजवळच आहेत. वाशी स्थानकातून वाशी गावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली अनेक भूखंड आहेत. पालिकेच्या वाशी येथील ईटीसी केंद्रासमोर असलेल्या ओरिसा भवनाच्या बाजूलाच कचरा उघडय़ावर फेकला जातो. याच परिसरातील मॉलमधील सफाई कामगार मॉलमधील कचरा आणून फेकतात. काळ्या पिशव्या भरून टाकल्या जाणाऱ्या या कचऱ्यामुळे येथे डुकरांचा उच्छाद वाढला आहे. या परिसरातून नाक मुठीत धरूनच जावे लागते. रघुलीला मॉलमधील कर्मचारी येथे कचरा टाकतात. या भूखंडाजवळच ईटीसी केंद्र आहे. तिथे येणाऱ्या अपंगांच्या आरोग्याचा प्रश्नही या कचऱ्यामुळे निर्माण झाला आहे.

याबाबत रघुलीला मॉलच्या व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नागरिकांना कचरा वर्गीकरणाची सक्ती करण्यावरून व सोसायटय़ांना नोटीस बजावल्यावरून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पाश्र्वभूमीवर शहरात उघडय़ावर कचरा टाकणाऱ्या मॉलकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर गुरुवारी पालिकेने रघुलीला मॉलच्या दारात कचरा टाकल्यामुळे रहिवाशांत समाधान व्यक्त होत आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात कचरा वर्गीकरण केले जात असून १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या २२ मोठय़ा हॉटेल्सपैकी २० हॉटेल्स कंपोस्टिंग करतात, तर शहरातील काही मॉलमध्येही कंपोस्टिंग केले जाते. रघुलीला मॉलशेजारील उघडय़ा जागेवर कचरा टाकण्यात येतो. त्यांना पालिकेने याआधीच नोटीस बजावली होती, मात्र त्यानंतरही कचरा एकत्रित स्वरूपात जवळच्या भूखंडावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी त्यांचा कचरा उचलण्यात आला नाही. मॉलने टाकलेला कचरा पुन्हा त्यांच्याच प्रवेशद्वारासमोर टाकण्यात आला आणि मॉलच्या कर्मचाऱ्यांना त्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास भाग पाडण्यात आले.     – तुषार पवार, उपायुक्त, घनकचरा विभाग

नवी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु जर कोणी उघडय़ावर कचरा फेकत असेल व शहर स्वच्छतेत बाधा आणत असेल तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई व्हायलाच हवी. पालिकेच्या संबंधित विभागामार्फत कारवाई करण्यात येईल.  – नेत्रा शिर्के, सभापती, शहर स्वच्छता तदर्थ समिती