|| जगदीश तांडेल

वाढत्या उरण तालुक्याला आरोग्य सेवा तोकडी

नवी मुंबईचाच एक भाग झालेल्या उरण तालुक्याचे नागरीकरण होत असून लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्या मानाने येथील आरोग्य सेवा तोकडी पडत आहे. ग्रामीण रुग्णालयाबरोबर शासनाचे केवळ एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. दीड लाख लोकसंख्येला (२०११ च्या जनगणनेनुसार) किमान पाच आरोग्य केंद्रांची गरज आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांची (बोगस) दुकानदारी वाढली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उरणसारख्या औद्योगिक तालुक्यातील आरोग्यस्थिती भयावह असल्याने याचा भार शेजारील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयावर पडत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवा सक्षम करण्याची मागणी होत आहे.

उरण तालुक्याच्या २०११ च्या जनगणनेनुसार १ लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. शासनाच्या नियमानुसार या लोकसंख्येसाठी किमान पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे तर त्याच्या दुप्पट उपकेंद्राची गरज आहे. असे असताना एकाच आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवा सुरू आहे. कोप्रोलीमध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथे मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तीन आहेत. मात्र दोघांकडूनच रुग्णांची सेवा केली जात आहे. दिवसाकाठी किमान १५० पेक्षा अधिक रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्राची वाट धरतात. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता अलिबाग किंवा वाशी (नवी मुंबई) येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या आरोग्य केंद्राबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी आहेत.

उरण ग्रामीण रुग्णालयात आवश्यक तो सेवक वर्ग आहे. मात्र सध्या या रुग्णालयासाठी असलेल्या रुग्णवाहिकेसाठी चालक नाही. त्यामुळे रुग्णांना ने-आण करणे कठीण झाले आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढल्याने ताणही वाढत आहे.    -डॉ. मनोज बद्रे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय

चाणजे व दिघोडे या दोन भागांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. यापैकी चाणजे केंद्र सुरू झाले आहे. तर दिघोडे केंद्रासाठी जागा उपलब्ध होत नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेसाठी चालकाची कमतरताही भरून काढली जाईल.  – मनोहर भोईर, आमदार

अनेक रुग्ण उरणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या नवी मुंबईतील वाशी किंवा इतर संस्थांच्या रुग्णालयात जात आहेत. शासनाची आरोग्यसेवा नसल्याने खासगी डॉक्टर वाढत आहेत. त्याचा आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.     – सुरेश ठाकूर, ग्रामस्थ.