कोप्रोली केंद्रातील कर्मचाऱ्यांवर ताण; वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण : उरण तालुक्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर आठ उपकेंद्रे आहेत. मात्र या केंद्रात काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला असून आरोग्य सेवा मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मनुष्यबळाबाबत स्थानिक आरोग्य विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

उरण तालुक्यातील जसखार व वशेणी अशा दोन नवीन उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. असे असले तरी उरण तालुक्यात एकमेव असलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात मनुष्यबळाचा तुटवडा आहे. येथील आरोग्य केंद्रात असणाऱ्या कमी कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य सेवेवर ताण पडत आहे. त्यामुळे उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांवरही याचा परिणाम होऊ लागला आहे.

तालुक्यातील गरीब ग्रामस्थांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी याकरिता शासनाकडून शासकीय पातळीवर आरोग्य केंद्रे उभारली आहेत. मात्र या केंद्रातून दिली जाणारी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. कोप्रोली येथील आरोग्य केंद्रात दोन आरोग्य अधिकारी, चार परिचारिका व आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून काम केले जात आहे. कमी मनुष्यबळामुळे उपचाराकरिता येणाऱ्यांना आरोग्यसेवा पुरविणे अशक्य होत आहे.  या संदर्भात उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इटकरे यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्य केंद्रात रिक्त जागा भराव्यात याकरिता मागणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.