21 January 2021

News Flash

निविदांमागून निविदा

वाढत्या करोना रुग्णांमुळे पालिका प्रशासनाने आपली आरोग्य व्यवस्था गेल्या काही महिन्यांत सक्षम केली आहे.

मनुष्यबळाचा तुटवडा; आरोग्य संस्थांकडूनही प्रतिसाद नाही

नवी मुंबई : पालिका प्रशासनापुढील आरोग्य विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न कायम आहे. अनेकदा भरती प्रक्रिया राब्विल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने अत्यवस्थ रुग्णांसाठीची रुग्णशय्या आरोग्य संस्थेच्या माध्यमातून चालविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिकेने दुसऱ्यांदा निविदा काढली आहे.

वाढत्या करोना रुग्णांमुळे पालिका प्रशासनाने आपली आरोग्य व्यवस्था गेल्या काही महिन्यांत सक्षम केली आहे. लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा व मनुष्यबळ पालिकेकडे आहे. मात्र अत्यवस्थ रुग्णांसाठी सुविधा अपुरी पडत असल्याने पालिका प्रशासनाने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात ७५ अतिदक्षता व ३० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा तसेच वाशी येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात १२५ आयसीयू व ५० कृत्रिम श्वसन यंत्रणा खाटांचे नियोजन केले आहे. मात्र पालिकेकडे ही व्यवस्था चालविण्यासाठी अनुभवी मनुष्यबळ नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडेही पालिकेने विचारणा केली, मात्र त्यांनी मनुष्यबळ नसल्याचे कारण दिले. त्यामुळे ही रुग्णशय्या अनुभवी आरोग्य संस्थेच्या माध्यमातून चालविण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. परंतु सर्वच ठिकाणी मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. पालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा फे रनिविदा काढण्यात आली आहे. या वेळी तरी प्रतिसाद मिळेल अशी आशा पालिकेच्या आरोग्य विभागाला आहे.

रुग्णवाढीची शक्यता

लोकलही सुरू होत असल्याने पुन्हा बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही रुग्णशय्या तयार ठेवणे गरजेचे आहे. सध्या शहरात अतिदक्षता ४४३ व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या १६३ खाटांची सुविधा उपलब्ध आहे. नव्याने अत्यवस्थ रुग्णांसाठी वाढविण्यात येत असलेली २८० खाटांची रुग्णशय्या मनुष्यबळ नसल्याने पडून आहे.

शहरात करोनाची स्थिती नियंत्रणात असून नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. वाशी सिडको प्रदर्शनी केंद्र व राज्य विमा कामगार रुग्णालय येथे एकू ण २८० खाटांसाठी अनुभवी संस्थेच्या मदतीसाठी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. प्रदर्शनी केंद्रात प्राणवायू यंत्रणेचे काम सुरू आहे. या वेळी निविदेला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:59 am

Web Title: lack of manpower tender after tender no response from health institutions akp 94
Next Stories
1 सिडकोची सहा हजार घरे विक्रीविना शिल्लक
2 कारागृह अधिकारी असल्याची बतावणी करीत फसवणूक
3 पालिकेच्या ऑनलाइन सभेवर आक्षेप
Just Now!
X