स्वच्छता सर्वेक्षण संपल्यामुळे सिडकोची पालिकेला अंतिम मुदत

पनवेलमधील शहरी भागातील घनकचरा व्यवस्थान सेवेच्या हस्तांतरात सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या पनवेल पालिकेला सिडको १५ मार्च रोजी ही नागरी सेवा हस्तांतरित करणार आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असल्यामुळे आणि अपुऱ्य् मनुष्यबळामुळे पनवेल पालिका ही सेवा घेण्यात टाळाटाळ करत आहे, मात्र आता कोणत्याही प्रकराची मुदतवाढ न देता १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण होऊन जाऊ दे, त्यानंतर ही सेवा हस्तांतरित करून घेऊ असे पालिकेने जानेवारीत स्पष्ट केले होते. हे सर्वेक्षण नुकतेच पार पडल्याने सिडको आग्रही झाली आहे. सिडकोच्या खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल या शहरी भागांतील घनकचरा व्यवस्थापन सेवा पनवेल पालिकेने हस्तांतरित करून घ्यावी यासाठी सिडको गेले वर्षभर पाठपुरावा करत आहे. पनवेल पालिकेच्या उत्पन्नाचे ठोस स्रोत अद्याप तयार झालेले नाहीत. अंदाजपत्रक साडेपाचशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नाही. त्यामुळे ही सेवा थोडय़ा कालावधीनंतर हस्तांतरीत करावी, अशी मागणी पालिकेने केली होती. राज्यातील एका श्रीमंत महामंडळाला एक सेवा हस्तांतरित करून घेतली नाही, तर काय फरक पडणार आहे, असा सवालही प्रशासनाने उपस्थित केला होता. त्यावर सिडकोने घनकचरा व्यवस्थापन ही पालिकेची जबाबदारी असल्याने ती हस्तांतरित करून घ्यावी लागले, असे ठणकावले होते. जर इमारत बांधकाम परवानगीचे अधिकार पालिका तात्काळ हस्तांतरित करून घेत असेल तर ही सेवा का नको, असा प्रतिप्रश्न सिडको केला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन हस्तांतरावरून सिडको व पालिकेत वाक्युध्द सुरू होते. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून पालिकेला मुदतवाढ द्यावी लागली होती. ही मुदत जानेवारीअखेर संपली मात्र केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत परीक्षण समिती शहराला भेट देणार असल्याने हस्तांतराची ही प्रक्रिया तोपर्यंत स्थागित करावी, असे पनवेल पालिकेने सिडकोला कळविले होते. तेव्हा १५ मार्चपर्यंत ही सेवा आम्ही हस्तांतरीत करून घेऊ असे पत्र पालिकेने सिडकोला दिले आहे. त्यामुळे सर्वेक्षण समिती पनवेलचे सर्वेक्षण करेपर्यंत थांबण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. गेल्या आठवडय़ात पनवेल पालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यामुळे पालिकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे १५ मार्च नंतर पालिका ही सेवा हस्तांतरित करून घेईल, असे सिडकोच्या सूत्रांनी सांगितले.

पनवेल पालिकेच्या मागणीनुसार सिडकोने अनेक वेळा घनकचरा हस्तांतर प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. पालिकेला ही सेवा आज ना उद्या हस्तांतरित करून घ्यावीच लागणार आहे. तेव्हा १५ मार्चला सेवा हस्तांतरित करून घेण्याची तयारी पालिकेने ठेवावी. तसे आश्वासनच पालिकेनेच पत्राद्वारे दिले आहे.    – डॉ. बी. एस. बावस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी, सिडको