|| सीमा भोईर

सेवा हस्तांतरणाआधी नियोजन न केल्याने सिडको नोडमध्ये कचऱ्याचे ढीग

घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्यात सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या पनवेल पालिकेने अखेर ही सेवा सिडकोकडून हस्तांतरित करून घेतली असली, तरी योग्य नियोजन न केल्यामुळे सिडको नोडमधील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे या भागांत कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्यामुळे दरुगधी पसरली आहे. परिसरातील रहिवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.

सिडको वसाहतींतील घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पनवेल पालिका प्रशासनाने घ्यावी, अशी आग्रही भूमिका सिडकोने सातत्याने घेतली होती. पालिकेने मनुष्यबळ, साधनसामुग्रीसह विविध मुद्दे उपस्थित केल्यामुळे वारंवार मुदतवाढही देण्यात आली होती. प्रदीर्घ काळ टाळाटाळ केल्यानंतर पालिकेने घनकचरा व्यवस्थापन सेवा हस्तांतरित करून घेतली आहे, मात्र त्यानंतरही योग्य नियोजन करण्यात आलेले नाही.

कचरा व्यवस्थापनासाठी पुरेशी साधनसामुग्री नसल्यामुळे खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे येथील कचरा उचलला जात नाही. पालिकेकडे व्यवस्था नव्हती तर सेवा हस्तांतरित का करून घेतली, असा प्रश्न कळंबोलीचे रहिवासी आत्माराम कदम यांनी उपस्थित केला. सिडको नोडसाठी किमान ८० ते ८५ कचऱ्याच्या गाडय़ांची गरज आहे, मात्र पालिकेकडे केवळ ३० ते ३५ गाडय़ा उपलब्ध आहेत. त्यातील काही गाडय़ा बिघडल्या आहेत.

कळंबोलीतील सेक्टर ४ मधील गोकुळधाम सोसायटी परिसरातील कचरा सहा दिवसांत उचलण्यात आलेला नाही. पालिकेने पुन्हा ही सेवा सिडकोकडे द्यावी. कचऱ्याचे ढीग साचत आहेत.   – विष्णू धुरे, रहिवासी, कळंबोली

पूर्वी जो सिडकोचा कंत्राटदार होता तोच कचरा उचलत आहे. गाडय़ाही त्याच आहेत. लवकरच ८३ वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. येत्या ७ ते ८ दिवसांत परिस्थितीत नक्कीच बदल होईल.   – गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका