|| सीमा भोईर

दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत आणि काही वेळा त्यानंतर, पावसाळ्यातही पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या पनवेलमध्ये पर्जन्य जलसंकलनाकडे पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. शहरातील एकाही गृहसंकुलात त्यासाठी आवश्यक सोयी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पनवेलवासीयांना केवळ पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ावरच अवलंबून राहावे लागत आहे.

पनवेल शहरातील पाणीपुरवठा केवळ गाढेश्वर धरणावर अवलंबून आहे. या धरणातील पाणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ातच तळ गाठते. त्यानंतर पनवेलकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून राहावे लागते. तो देखील अनियमित असतो, त्यामुळे टँकर माफियांचेही फावते. ते अतिरिक्त दर आकारून पाणीपुरवठा करतात.

पावसाचे पाणी टाक्यांमध्ये साठवून ठेवल्यास अशा टंचाईच्या काळात त्याचा वापर करता येऊ शकतो. इमारतीचे बांधकाम करतानाच पर्जन्य जलसंकलनासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे बंधनकारक आहे, मात्र तरीही कोणत्याही इमारतीत अशा सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत आणि तशा त्या करण्यात याव्यात यासाठी पालिकाही आग्रही नाही.

पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली व तळोजा या भागांत पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक अधिकधिक गंभीर होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी इमारतीत साठवल्यास पनवेलमधील पाणी प्रश्नाची दाहकता कमी होण्याची शक्यता आहे.

पनवेलमध्ये पर्जन्य जलसंकलनाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. पावसाच्या साठवलेल्या पाण्याचा वापर सोसायटय़ांनी केल्यास महापालिकेच्या पाणीपुरवठय़ावरील ताणही कमी होईल. हा प्रकल्प राबवणाऱ्या गृहसंकुलांना पालिका प्रोत्साहन देईल.   – जमीर लेंगरेकर, उपयुक्त, पनवेल महानगरपालिका

पर्जन्य जलसंकलनाविषयी महापालिकेने धोरण निश्चित करावे. नव्या इमारती उभरण्याची परवानगी देताना इमारतीत भूमिगत टाक्या बंधून पावासाचे पाणी साठवण्याची सोय करणे बंधनकारक करावे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणे शक्य होईल.   – चंद्रकांत शिर्के, सामाजिक कार्यकर्ते, पनवेल