28 May 2020

News Flash

खरा वारसदार कोण?

पाटणोली व वहाळ गावातील ८०० एकर जमिनीचे मूळ मालक सय्यद मोहम्मद शाह यांची वडिलोपार्जित जमीन होती.

८०० एकर जमिनीसाठी जिवंत मालकाला ‘कागदोपत्री’ मारले

मूळ मालक जिवंत असताना त्याच्या वारसदाराच्या मृत्यूचा दाखला विविध न्यायालयांतून मिळवून तसे हक्कनोंदीचे आदेश १९ वारसदार पनवेलच्या महसूल विभागात दाखल करत आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाटणोली आणि वहाळ येथील ५०० कोटींच्या ८०० एकर जमिनीचे खरे वारसदार कोण, हा प्रश्न पनवेलच्या महसूल विभागाला पडला आहे. एकच व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र चार वेगवेगळ्या ठिकाणांहून कसे मिळू शकते, असा प्रश्न समोर येत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्रातील जमिनीच्या तुकडय़ावर नाव चढविण्यासाठी आणि त्याचा ताबा मिळविण्यासाठी प्रत्येक जण सध्या ‘मेहनत’ घेत असल्याचे चित्र पनवेलमध्ये आहे. गावागावात वीतभर जमिनीसाठी भाऊबंदकी ओढवते. अशात पाटणोली आणि वहाळ गावामधील ८०० एकर जमिनीवर सय्यद मोहम्मद शाह यांचे वारसदार असून त्यावर नाव चढविण्यासाठी  आग्रा, पुणे, वाई, मुंबई, नवी मुंबई येथून तब्बल १९ जणांनी दावा केला आहे. यासाठी मूळ मालकाचे मृत्यू प्रमाणपत्र तीन न्यायालयांतून सादर केल्याने पनवेल महसूल विभाग गोंधळात पडला आहे.

पाटणोली व वहाळ गावातील ८०० एकर जमिनीचे मूळ मालक सय्यद मोहम्मद शाह यांची वडिलोपार्जित जमीन होती. शाह यांच्या वतीने अब्दुल हमीद काद्री यांच्या नावे ती सध्या नोंदवली आहे. १९९५ साली सय्यद शाह यांनी हारमेन बिल्डर्सचे भागीदार अजयकुमार रामचंद्र मिश्रा, इमामुद्दीन निहालुद्दीन शेख यांच्यासोबत या जमिनीचा करार केला होता, असे दस्त महसूल विभागाकडे जमा आहेत. या जमिनीपैकी काही जमीन बडय़ा व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे; मात्र दोन महिन्यांपासून अब्दुल हमीद काद्री यांचे मृत्युपत्र आग्रा येथून पनवेल महसूल विभागात मंझूर अहमद मेहबूब खान यांच्या वकिलाने सादर केले आणि जमिनीवर वारसाहक्कात नाव चढवण्यासाठी दावा केला. या दाव्यावर न्यायनिवाडा सुरू असताना पुणे येथे राहणारे गौतम बुधराणी यांनी काद्री यांचे संमतिपत्र सादर करीत याच जमिनीवर हक्क असल्याचा दावा पनवेल महसूल विभागाकडे नोंदविला. या प्रकरणातील खरे कोण दावेदार हे शोधेपर्यंत श्रीवर्धन येथून सय्यद मुश्ताक सय्यद अहमद काद्री यांनी अब्दुल हमीद काद्रींचे वारसदार, असे सांगून तसे पुरावे महसूल विभागाकडे जमा केले आहेत.

प्रत्येक जण दावा करताना न्यायालयाचे मृत्युपत्र व न्यायालयाने दिलेले आदेश सोबत घेऊन येत असल्याने नेमके कोण खरे व कोण खोटे, असा प्रश्न महसूल विभागातील तज्ज्ञांना पडला असताना सय्यद सिराजूल हसन, महेबूब बेगम करिमुल्ला, सिराजुन्निसाल बेगम सय्यद अब्दुल अली, आफजुन्निसा बेगम अजमतुल्ला शहा, शरिफ रमझुन्निसा बेगम अली, अब्बास निसा बेगम या हैदराबाद येथे राहणाऱ्यांनी या जमिनीवर हक्क सांगितल्याने महसूल विभागातील तज्ज्ञांना विचार पडला. या गोंधळाच्या परिस्थितीमुळे नेमके कोणाच्या पुराव्यांवर विश्वास ठेवायचा या पेचात असताना कोंडवा पुणे येथील जमिल अहमद गुलाम जिलानी नवाब व सादिक गुलाम जिलानी नवाब यांनीही वारसहक्क नोंदीचे न्यायालयाचे आदेश आणून महसूल विभागाचा गोंधळ वाढविला. यावर निर्णय देण्याच्या अगोदर वाई येथील न्यायालयातून कमर ताज इस्माईल अली नवाब, लुकमान इस्माईल अली नवाब, शिरीन एस. देसाई, जरीन इस्माईल अली नवाब, सलमान इस्माईल अली नवाब, अल्ताफ हुसेन फसिउद्दीन काझी यांनी वारसहक्क नोंदीचे पहिल्या दावेदारांप्रमाणे आदेश आणले असून सध्या या मालमत्तेमध्ये नेरुळ येथील राजेंद्र हरिभाऊ धनावडे यांनीही वारसहक्काची नोंद मागितली आहे. विशेष म्हणजे या जमिनीचे मूळ मालक सय्यद शाह हे जिवंत असल्याचे महसूल विभागाला समजले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी कोणत्याही एका दावेदाराने स्वत:हून आपले दस्तऐवज खरे असून इतर दावेदारांनी खोटी कागदपत्रे आणली आहेत याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क झाला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2016 4:06 am

Web Title: land dispute cases
Next Stories
1 जत्रांमुळे कोंबडी महागली
2 नेरुळमधील ‘डीपीएस’च्या शुल्कवाढीविरोधात मोर्चा
3 ‘एनएमएमटी’चे व्यवस्थापक आठ वर्षांपासून ‘बेघर’
Just Now!
X