वाशीतील एपीएमसी बाजारात परराज्यांतील भाज्यांचा हंगाम सुरू झाला असून भाज्यांची मोठी आवक होत आहे. त्यामुळे इतर भाज्यांचे दर आवाक्यात आले आहेत. बाजारात हिरवा वाटाणा, गाजर, कोबी, फ्लॉवर या भाज्यांची आवक वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. सध्या बाजारात परराज्यांतील भाज्या येत असल्याने भाज्यांचे दर आवाक्यात आले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ३० ते ४० रुपयांवर आला आहे.  सध्या बाजारात मध्य प्रदेश, इंदूर येथून हिरवा वाटाणा दाखल होत आहे. सध्या बाजारात ४ हजार २६३ क्विंटल आवक झाली आहे. किरकोळ बाजारात वाटाणा प्रतिकिलो ४० रुपयांवर आला आहे. राजस्थान येथून दोन हजार १५ क्विंटल गाजर दाखल झाले आहे. प्रतिकिलोला २४ ते ३६ रुपये दर आहे. गुजरातमधून कोबी आणि फ्लॉवरची दोन हजार ९० क्विंटल आवक झाली आहे. फ्लॉवर २० ते २४ रुपये प्रतिकिलो मिळत आहे. याशिवाय कोबीची दोन हजार ८३१ क्विंटल आवक झाली आहे. किरकोळ बाजारात १८ ते २४ रुपये भाव मिळत आहे.

शेवगा कमीच

एपीएमसी बाजारात केरळ येथून शेवगा शेंग दाखल होत असते; परंतु पावसामुळे शेवगा शेंग उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे बाजारात अल्प प्रमाणात आवक होत असून आज बाजारात एकही गाडी दाखल झाली नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात शेवगा शेंगाची किंमत वधारल्याने किरकोळ बाजारातून शेंग गायब झाल्यात जमा आहे.