चार एकर जागेवर राडारोडय़ाचा भराव; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

 नवी मुंबई खारघर सेक्टर १८ व १९ जवळील मोर्बी गावानजीक चार एकर क्षेत्रफळावरील पाणथळ जमिनीवर मोठय़ा प्रमाणात बांधकाम कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे तिथे भराव टाकून भूखंड तयार करून तो गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ‘अभिव्यक्ती’ या सामाजिक संघटेनेने यासंदर्भात पर्यावरण आयुक्तांशी पत्रव्यवहारात केला आहे. पाणथळ जागा संरक्षण समितीला या जागेची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले असून सिडकोला एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

खारघर सेक्टर १८ व १९ जवळ मोर्बी हे गाव आहे. एका बाजूला गाव आणि दुसऱ्या बाजूला शहरी भागाच्या मधोमध एक तलावसदृश पाणथळ जागा आहे. गेली तीन वर्षे विविध भागांतून आणलेला बांधकाम कचरा तिथे टाकला जात आहे. प्रारंभी कमी प्रमाणात असलेला हा भराव आता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाला असून पाणथळ जागेचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. या जमिनीचे मालक असलेल्या सिडको अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून हा भराव टाकला जात असल्याचा आरोप ‘अभिव्यक्ती’ने केला आहे. या जागेवर सर्व बाजूंनी भराव टाकून त्याचे भूखंड तयार करून विकण्याचा सिडकोचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे ही जमीन २०० ते ३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. खारघरसारख्या विकसित शहरात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. मे २०१५ ते मे २०१८ या तीन वर्षांत हा भराव टाकण्यात आला असून सपाटीकरण करून जमीन तयार केली जात आहे, असे ‘अभिव्यक्ती’चे म्हणणे आहे. त्यामुळे सिडकोच्या परवानगीनेच ही पाणथळ जमीन बुजवली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सिडकोकडे तक्रार केल्यानंतर भराव टाकू नये, असा मोघम फलक लावण्यात आला. नवी मुंबईतील अनेक नाले, गटारे आणि मोकळ्या मैदानांवर मुंबईहून आणलेला बांधकाम कचरा टाकला जात आहे. खारघर परिसरात मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने भराव टाकण्यासाठी तलाव बुजवण्याचे काम केले जात आहे. या संदर्भात ‘अभिव्यक्ती’ या संस्थेने पर्यावरण व पाणथळ आयुक्तांकडे दाद मागितली आहे. त्यासाठी गुगलवरील २०१५ मधील पाणथळ जमिनीचे नकाशे सादर केले आहेत. आयुक्तांनी या अर्जाची दखल घेऊन एक महिन्यात अहवाल द्यावा, असे आदेश दिले आहेत. पाणथळ जागा संरक्षण समितीला या जागेची पाहणी करण्यास सांगण्यात आले आहे.

‘हे तर सांडपाणी’

पर्यावरण आयुक्त अथवा सचिवांचे अद्याप या संदर्भातील कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, पण ही जमीन सिडकोच्या मालकीची असून तिथे जलस्रोत असल्याचा पुरावा नाही. पावसाळी पाणी आणि गावाचे सांडपाणी खोलगट भागात जमा झाल्याने भराव टाकला जात आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जातील, असे सिडकोच्या एका अधीक्षक अभियंत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले

सुरुवातीला भरावाचे प्रमाण एवढे मोठे असेल, असे वाटले नव्हते. अनेक वेळा तक्रार करूनही सिडकोने पोलीस तक्रार केलेली नाही. केवळ एक फलक लावण्यात आला आहे. आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर सिडकोला अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिडकोच्या संमतीनेच हा तलाव बुजवला जात आहे.

– दीपक सिंह, सदस्य, अभिव्यक्ती समूह, खारघर