17 July 2019

News Flash

११ महिन्यांत दोन कोटी लिटर दारू रिचवली!

शहरात आजही देशी दारूची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शेखर हंप्रस

नवी मुंबईत मद्यविक्रीचा आलेख चढताच; बियर, विदेशी मद्याप्रमाणेच देशी दारूचीही मागणी कायम

वाढत्या नागरी वस्तीमुळे ‘मिश्र संस्कृती’ असलेले शहर बनत चाललेल्या नवी मुंबईत आता या संस्कृतीची जीवनशैलीही चांगलीच रूजू लागली आहे. त्यामुळेच की काय, गेल्या अकरा महिन्यांमध्ये नवी मुंबईकरांनी तब्बल दोन कोटी ११ लाख ५१ हजार ६२२ लिटर इतकी दारू रिचवली आहे. यामध्ये बियर आणि विदेशी मद्याचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास असले तरी, शहरात आजही देशी दारूची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

राहायला नवी मुंबईत आणि नोकरी-धंद्यासाठी मुंबई, ठाण्यात असा बहुतांश नवी मुंबईकरांचा प्रवास दररोज सुरू असतो. त्यामुळेच या शहराला ‘डॉर्मेटरी सिटी’ असेही म्हटले जाते. अशा धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांचे आर्थिक राहणीमान उंचावत असले तरी, त्याचे काही विपरित परिणामही दिसून येतात. सायंकाळनंतर शहरातील सर्वच बार आणि वाइन शॉप ग्राहकांच्या गर्दीने फुलून जात असल्याचे दिसून येते. शहरातील मद्यविक्रीचा आकडा याकडेच बोट दाखवू लागला आहे. उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील मद्यविक्रीची आकडेवारी जाहीर केली असून त्यानुसार या ११ महिन्यांत नवी मुंबईकरांनी दोन कोटींहून अधिक लिटर दारू रिचवल्याचे उघड होत आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षांत म्हणजेच २०१७-१८ मध्ये दोन कोटी ४३ लाख ६४ हजार २९९ लिटर मद्याची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदाचा आकडा कमी दिसत असला तरी, यात एका महिन्यातील मद्यविक्रीची भर पडणे बाकी आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने निवडणूक काळात मद्यविक्रीत किमान ६० लाख लिटरची वाढ होईल, असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अवैध मद्यविक्री करणाऱ्या दोन जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून देशी व विदेशी दारूचा १३ हजार ९२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने मंगळवारी  ही कारवाई केली.

महसूल वाढण्याची अपेक्षा

२०१७-१८ या आर्थिक वर्षांत १७ कोटी ५ लाख ८ हजार ८१० चा महासून जमा झाला होता. तर २०१८-१९ (१ एप्रिल १८ ते फेब्रुवारी १९) पर्यंत ४ कोटी ६६ लाख ९१ हजार २४० चा महसूल मिळाला आहे. मात्र परवाना देणे, नूतनीकरण आणि दंड आकारणीतून महसूल मिळतो. त्यामुळे या शेवटच्या महिन्यात यातून मोठा महसूल जमा होत असून गेल्या वर्षीच आकडा पार करून यात ३० लाखांपर्यंतची वाढ होईल, असा उत्पादन शुल्कला विश्वास आहे.

विभागनिहाय मद्यविक्री

‘डी’ (तुर्भे, कोपरखरणेचा काही भाग, घणसोली ते ऐरोली)

९७,०२,७४७

‘ई’ (तुर्भे, कोपरखरणे, वाशी, एपीएमसी, महापे)

३१,८०,९११

‘एफ’ (तुर्भे एमआयडीसी, सानपाडा ते बेलापूर)

८२,६७,९६४

२०१७-१८ च्या तुलनेत या अकरा महिन्यात देशी दारू विक्रीत ४४ हजार ७०४ लिटरची तर विदेशी दारूत २ लाख ४ हजार ४४६ लिटरची वाढ झाली असून बीअरची विक्री ३४ लाख ७३ हजार १२८ लिटरन घटली आहे.

First Published on March 14, 2019 1:27 am

Web Title: last 11 months two million liters of liquor was rich