गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी; फळे भिजल्याने दर्जा घसरला

दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका स्ट्रॉबेरी या पिकाला बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत १०० क्रेट माल एपीएमसीत कमी आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीच्या हंगामाला सुरुवात होते. यंदा हंगाम सुरू होतानाच पाऊ स पडल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. भिजलेली स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत असल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ३०० ते ४०० क्रेट स्ट्रॉबेरी दाखल झाली होती, परंतु आता २०० ते २५० क्रेटच दाखल झाल्या असून तोही भिजलेला माल आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात अधिक प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जाते. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत हा हंगाम असतो.

घाऊक बाजारात पाव किलो स्ट्रॉबेरीला १५० ते २५० रुपये तर प्रतिकिलोला ६०० ते १००० रुपये भाव आहे. उशिरा लागवड केलेल्या पिकाचे उत्पादन डिसेंबर महिन्यात येईल, असे शेतकरी अनिल बावळेकर यांनी सांगितले.

अंजिरावरही परिणाम

अंजीर फळाचाही हंगाम सुरू असून त्यावरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. सध्या एपीएमसी बाजारात पुरंदर, सासवड, वेल्हा येथून ४ ते ५ टेम्पो अंजीर दाखल होत असून ४ डझनला २०० ते ३५० रुपये बाजारभाव आहे.

सध्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला, मात्र स्ट्रॉबेरी उत्पादन घेणाऱ्या भागात पाऊ स पडल्याने भिजलेली स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे फळे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

– संजय पिंपळे, घाऊक फळ व्यापारी, एपीएमसी