पहिल्याच पावसात प्रकार घडल्याने देखभालीविषयी शंका

उरण : जेएनपीटीहून जासई दास्तान येथे उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाच्या भिंतींमध्ये पावसाचे पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आहे.  त्यामुळे स्मारकातील पुतळे तसेच इतर कलाकृती झिरपणाऱ्या पाण्यामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात जेएनपीटी प्रशासनाच्या सार्वजनिक विभागानेही असा प्रकार घडत असल्याचे मान्य केले आहे. मात्र स्मारकाला गळती लागली नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

३० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून जेएनपीटीने हे शिवस्मारक उभारले आहे. या स्मारकाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी जेएनपीटीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा पुतळा या स्मारकात आहे.

या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले आहे. असे असले तरी पहिल्याच पावसाळ्यात स्मारकाच्या भिंतींमध्ये ओलावा येऊ लागला आहे. स्मारकाच्या भिंतींचा गिलावा योग्य पद्धतीने झाला आहे किंवा काय, याविषयी विचारणा केली असता स्मारकाची सुरक्षा आणि देखभालीसाठी कामगार तैनात असल्याचा दावा ‘जेएनपीटी’च्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुनील मतभावे यांनी केला. पाऊस जास्त असल्याने व पहिलेच वर्ष असल्याने भिंतींना ओलावा आल्याचे ते म्हणाले.

त्याच वेळी करोनाकाळात कामगार संख्या मर्यादित असल्याने स्मारकाच्या देखभालीचे काम रखडल्याचा आरोप सदस्यांनी केला. हे स्मारक म्हणजे श्रद्धास्थान आहे. त्याची व्यवस्थित देखभाल करण्याचीही मागणी केली जात आहे.