नवी मुंबई : सिडकोने महागृहनिर्मितीतील २५ हजार घरांचा ताबा देण्यास १ जुलैपासून सुरुवात केली असून या योजनेतील काही लाभार्थी अपात्र ठरल्याने त्यांच्या घरांची लवकरच सोडत काढली जाणार असल्याचे समजते. या अपात्र ठरलेल्या सात हजार घरे प्रथम प्रतीक्षा यादीतील ग्राहकांना दिली जाणार आहेत. त्यानंतर शिल्लक घरांची सोडत काढण्याची शक्यता आहे.

सध्या मात्र सिडको महा गृहनिर्मितीतील संपूर्ण घरांची रक्कम भरलेल्या लाभार्थीना घरे देण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे. त्यामुळे ही सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काढली जाणार असल्याचे समजते.

सिडको खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या नोडमध्ये सुमारे २५ हजार घरांचे बांधकाम करीत आहे. या घरांची सोडत दोन वर्षांपूर्वी काढण्यात आली असून त्यातील सर्व हप्ते व देखभाल खर्च भरलेल्या ग्राहकांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरूआहे. करोनाचे नियम पाळून या ग्राहकांना वेळ देऊन घरांचे ताबा देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. या संपूर्ण महागृह निर्मितील सात हजार घरे अपात्र ठरलेली आहेत. यात उत्पन्नाचा दाखला आणि इतर पुरावे सादर करण्यात अपात्र ठरलेल्या ग्राहकांचा समावेश आहे. विविध छाननीत अपात्र ठरलेल्या या ग्राहकांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना संधी दिली जाणार आहे. ही संधी त्याच संर्वगात राखीव असलेल्या ग्राहकांना दिली जात असून याशिवाय शिल्लक राहिलेल्या घरांची लवकर विक्री करण्याच्या दृष्टीने सिडको या घरांची देखील सोडत काढण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे.

सध्या महागृहनिर्मितीतील घरांची सर्व रक्कम भरलेल्या ग्राहकांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू असून ताबा घेतलेल्या ग्राहकांची घराबद्दल तक्रारी आहेत तर ज्या ग्राहकांनी एखादा हप्ता भरला आहे. त्यांना अजून मुदत वाढ देण्याची मागणी केली जात आहे.