News Flash

एलईडीखाली उधळपट्टीचा अंधार

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्मार्ट एलईडी लावण्याच्या प्रस्तावातील खर्चाचे आकडे वादग्रस्त ठरले आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

स्मार्ट चिपची संख्या वाढवून खर्चफुगवटा

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्मार्ट एलईडी लावण्याच्या प्रस्तावातील खर्चाचे आकडे वादग्रस्त ठरले आहेत. प्रत्येक दिव्याची परिपूर्ण माहिती नोंदवण्यासाठी त्यावर स्मार्ट एलईडी चिप लावणे आवश्यक आहे. एका चिपवर अनेक दिव्यांची माहिती नोंदवणे शक्य असताना प्रत्येक दिव्यासाठी स्वतंत्र चिपचा खर्च गृहीत धरून प्रस्ताव तयार केल्यामुळे खर्चाचा आकडा अवाच्या सवा फुगला आहे. यावरून संबंधित अधिकाऱ्याला आयुक्तांनी जाब विचारल्याचे आणि प्रस्ताव थांबविल्याचे कळते.

राज्य सरकारने १२ जानेवारी २०१७ पासून पालिकांना बंधनकारक करण्यात आलेल्या एलईडी दिव्यांचे नवे धोरण महापालिकेने तयार केले असून शहर एलईडीने उजाळण्यासाठी धोरणनिश्चितीचा प्रस्ताव महापालिकेत शुक्रवारी मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. एकीकडे एलईडी लावून वीज देयकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त बचत होणार आहे; परंतु एकीकडे वीजबचत व वीज देयकासाठी राज्य शासन व महापालिका प्रयत्नशील असताना पालिकेच्या स्मार्ट एलईडीच्या खर्चाच्या प्रस्तावांमुळे आयुक्तांचे डोळे भिरभिरले असल्याने खर्च फुगवटा करणाऱ्या अधिकाऱ्याला आयुक्तांनी चांगलेच फैलावर घेतले असून स्मार्ट एलईडीच्या मंजूर प्रस्तावाच्या कामाला आयुक्तांनी चाप लावला आहे. त्यामुळे स्मार्ट एलईडीच्या नावाने चांगभलं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नवी मुंबई महापालिका स्थापन करण्यात आल्यानंतर शहरात दिवाबत्तीसाठी सोडियम व्हेपरच्या दिव्यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे विजेचा वापर जास्त होऊन वीज बिलही अधिक भरावे लागत आहे. त्यांचा देखभालीचा खर्चही जास्त आहे. त्यामुळे वीजबचतीसाठी शहरात १४,५०० एलईडी दिवे लावण्याच्या तयारीत पालिका आहे. एलईडीमुळे वीज देयकात ५० टक्के घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एलईडी दिवे बसवणाऱ्या कंपनीला देऊन ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर जाहिरातीचे हक्क देण्यात येणार आहेत.

या संदर्भातील प्रस्ताव मंजूर झाला असून, त्यात प्रत्येक पथदिव्यावर स्मार्ट एलईडी चिप लावण्याचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. हा अनाठायी खर्च टाळण्यासाठी स्मार्ट एलईडीचे प्रस्ताव थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा बागुलबुवा दाखवत खर्चाचे आकडे फुगवण्याच्या प्रयत्नांना आयुक्तांनी चाप लावला आहे. त्यामुळे स्मार्ट एलईडीबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

प्रत्येक खांबावर वीज सर्वेक्षणाची चिप न लावता अनेक पथदिवे मिळून त्यांचा एक समूह करता येणे शक्य आहे.  प्रत्येक दिव्यासाठी स्वतंत्र चिप बसवणार असल्याचे दर्शवल्याने घणसोली भागातील अशा प्रकारचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.    – डॉ. रामास्वामी एन., आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:13 am

Web Title: led bulbs scam in mumbai
Next Stories
1 महिला ५७ लाख, शौचालये ४ हजार
2 करावेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
3 धर्माधिकारी कलासंकुलात चोरी
Just Now!
X