बेकायदा एलईडी मासेमारीविरोधात उरणमधील मच्छीमारांचे आंदोलन सुरू असतानाच, अशा समुद्रात सोडण्यात येणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या दिव्यांमुळे आकर्षित होऊन जेलीफिश किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्यांना त्यांचा त्रास होत आहे. मच्छीमारांसह किनाऱ्यावरील रहिवाशांनाही धोका वाढला आहे. शासनाचे दुर्लक्ष मात्र कायम आहे.

समुद्रात मासेमारी करण्यासाठी २ ते ३ हजार वॅटचे दिवे लावले जात आहेत. या दिव्यांमुळे खाण्यायोग्य माशांबरोबरच समुद्रातील धोकादायक व विषारी जेलीफिशही मोठय़ा प्रमाणात आकर्षित होत आहेत. या माशांच्या काटय़ामुळे इजा होण्याचा धोका असतो.

सामान्यपणे खोल समुद्रातच असलेले हे जेलफीश सध्या किनाऱ्यालगतही दिसू लागले आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री मासेमारी करणाऱ्यांना याचा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी दिली. आधीच बेकायदा मासेमारीमुळे व्यवसाय धोक्यात आला असताना जेलीफिशमुळे आणखी एक संकट मासेमारांवर ओढवले आहे, असे त्यांनी सांगितले.