नवी मुंबईतील स्थानकांवर दोन महिन्यांत एलईडी दिवे लावणार

मध्य रेल्वेवरील स्थानके एलईडीच्या प्रकाशाने उजळून निघाल्यानंतर आता ट्रान्स हार्बर मार्गावरील अंधारलेल्या रेल्वे स्थानकांतही लखलखाट होणार आहे. येत्या दोन महिन्यांत नवी मुंबईतील सर्व स्थानकांत जुने दिवे बदलून एलईडी दिवे लावण्यात येणार असल्याची माहिती सिडकोतील अधिकाऱ्यांनी दिली.

नवी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांत अंधाराचा फायदा घेऊन केल्या जाणाऱ्या चोऱ्या आणि अन्य गैरप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. जुईनगर रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी एक महिलेची चालत्या ट्रेनमधून बॅग हिसकाविण्यात आली होती. ही महिला चालत्या गाडीतून पडून गंभीर जखमी झाली. तुर्भे येथे रेल्वे स्थानकात भरदिवसा तरुणीचा विनयभंग करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी लूटमारीचे प्रकार वाढले होते. एलईडीमुळे थोडय़ा प्रमाणात का होईना चोरांवर वचक बसेल आणि विजेचीही बचत होईल, असे सिडकोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्व रेल्वे स्थनाकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र तरीही अंधाराचा गैरफायदा भुरटे चोर घेतात. काळोखामुळे चोरटय़ांचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही. ऐरोली, वाशी, जुईनगर, सानपाडा, बेलापूर, पनवेल, तुर्भे या ठिकाणी रात्री प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. तुर्भे, जुईनगर ही स्थानके तर चोरटय़ांचा अड्डाच झाली आहेत.

वाशी, ऐरोली आणि बेलापूर स्थानकात दुपारीदेखील काळोख असतो आणि नेहमीच गर्दी असते. त्यामुळे ऐरोली ते तुर्भे आणि वाशी ते पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांत एलईडी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती सिडकोने दिली आहे.

याआधी सर्व स्थानकांत मक्र्युरी आणि नंतर सोडियम वेपरचे दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर हॅलोजन्स बसविण्यात आले. आता त्याची जागा एलईडी घेणार असून यातून मोठय़ा प्रमाणात विजेची बचत होणार आहे.

वाशी स्थानकात काम सुरू

वाशी स्थानक नेहमी गर्दीने गजबजलेले असते. तरीही कायमच अंधारलेल्या या स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. या स्थानकात १०० एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. सध्या फलाट क्रमांक दोन वर व जिन्यात एलईडी बसविण्यात आले आहेत.