News Flash

नवी मुंबईतील रस्त्यांवर आता एलईडीचा प्रकाश

केंद्र सरकारच्या वीज वाचवा अभियानाअंतर्गत एलईडी दिव्यांना महत्त्व देण्यात आलेले आहे.

led-bulp
केंद्र सरकारच्या वीज वाचवा अभियानाअंतर्गत एलईडी दिव्यांना महत्त्व देण्यात आलेले आहे

जाहिरातींच्या मोबदल्यात दिवे; महानगरपालिकेच्या निधीची बचत

नवी मुंबई महापालिका शहरातील मोक्याच्या रस्त्यावर पदरमोड न करता एलईडी दिवे लावून शहर उजळून टाकणार आहे. यासाठी वाशीतील दोन मुख्य रस्ते, पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग आणि मुलुंड-ऐरोली रस्ता यांना एलईडीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. आठ हजार विद्युत खांबावरील १४ हजार ८६ सोडियम व्हेपर दिव्यांऐवजी हे एलईडी दिवे वापरा आणि हस्तांतर करा या धर्तीवर लावले जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या वीज वाचवा अभियानाअंतर्गत एलईडी दिव्यांना महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेकांनी घरगुती वापरासाठी याच दिव्यांचा सध्या वापर सुरू केला आहे. याउलट शासकीय व निमशासकीय संस्थांच्या रस्त्यांवरील दिवाबत्ती आजही सोडियम व्हेपर दिव्यांद्वारे केली जात आहे. नवी मुंबईत एकूण ३८ हजार रस्त्यांवर दिवे आहेत. त्यांच्या वीजाबिलापोटी वर्षांला साठ ते सत्तर कोटी रुपये पालिकेला खर्च करावे लागतात. त्यासाठी एलईडी दिव्यांचा पर्याय विद्युत विभागासमोर असून बीओटी तत्त्वावर हे विद्युत खांब दिले जाणार आहेत. त्या बदल्यात एलईडी दिवे लावणारी कंपनी त्या खांबावर जाहिरात फलक लावून आपला खर्च वसूल करणार आहे.

पामबीच मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, मुलुंड-ऐरोली मार्ग, वाशी येथील अंतर्गत दोन मुख्य रस्ते अशा मोक्याच्या रस्त्यांवरील १४ हजार दिवे बदलेले जाणार आहेत. पालिकेने या कामाची निविदा दोनदा प्रसिद्ध केली आहे. खांब दत्तक घेणाऱ्या कंपनीला त्या खांबाची व एलईडी दिव्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा पालिकेचा निधी खर्च न करता एलईडी दिवे लावण्याच्या या प्रस्तावाला सहमती दिली होती. नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्गावर आता नवीन दोन उड्डाणपूल बांधण्यात येत असून, हे सर्व क्षेत्र आयटी कंपन्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयांनी आधीच झगमत आहे. एलईडी दिव्यांमुळे हा रस्ता आणखी उजळणार आहे.

महापालिकेचा निधी खर्च न होता एलईडी दिवे लावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली होती. यामुळे निधी आणि विजेची बचत होणार आहे. शहरातील मोक्याच्या मार्गावर हा प्रयोग केला जाणार असून जाहिरात स्वरूपात एलईडी दिवे लावणारी कंपनी आपला खर्च वसूल करणार आहे.

– मोहन डगांवकर, मुख्य अभियंता, नवी मुंबई पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2017 3:47 am

Web Title: led lights now on the streets of navi mumbai
Next Stories
1 कामोठेवासीयांचा ‘वळसा’ थांबेना!
2 मुजोर रिक्षाचालकांपुढे एनएमएमटी हतबल
3 पाऊस पडताच चिवणी मासे बाजारात
Just Now!
X