गंभीर गुन्ह्य़ांच्या तपासात ताण वाढत असल्याबद्दल पोलीस आयुक्तांकडून खंत

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यातही पोलिसांचा अधिक वेळ घेणाऱ्या प्रकरणांनी नवी आव्हाने उभी केली आहेत.

यात सर्वाधिक वेळ ‘सिटिझन पोर्टल’द्वारे केल्या जाणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात जात असल्याचे  स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलीस आयुक्त संजयकुमार यांनीही  या स्थितीबाबत खंत व्यक्त केली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दिघा ते सीबीडी बेलापूर हा परिमंडळ एकचा भाग आहे. या परिसरात सुमारे १३ लाख लोकसंख्या तर पनवेल, उरण जेएनपीटी ते घारापुरीपर्यंतच्या भागात १२ लाखावर लोकसंख्या आहे. या दोन्ही भागांसाठी पोलिसांची संख्या पाच हजार इतकीही नाही. त्यामुळे आधीच अत्यल्प मनुष्यबळाच्या मदतीने ही जबाबदारी पार पाडली जात आहे.

अगा जे घडलेच नाही..

* अमुक एका ठिकाणी असा प्रकार सुरू आहे, लॉजवर गैरप्रकार सुरू आहेत, डान्सबार सुरू आहे, अशा तक्रारी होत्या. या तक्रारींबाबत पूर्णत: गुप्तता राखण्यात येते. तक्रार नोंदविल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यावर तक्रार दिल्याप्रमाणे प्रकार सुरूच नसतो. तक्रार करणाऱ्या व्यक्तीही निवडक असल्याचे उघड झाले आहे. मात्र आलेल्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेण्याचे आदेश असल्याने काही कमी महत्त्वाच्या  तक्रारींचीही दखल घ्यावी लागते आणि  कारवाई करावी लागते.

* याशिवाय बेपत्ता व्यक्तींचा तपास सुरू असतो. अनेकदा बेपत्ता व्यक्ती घरी आलेलीही असते, मात्र अनेक प्रकरणांत तक्रारदार पोलिसांना याची माहिती देत नसल्याने पोलीस त्यांचा शोध घेत असतात. ठरावीक दिवसांनी जेव्हा आढावा घेतल्यानंतर बेपत्ता व्यक्ती घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याची बाब उघड झाली आहे.

* समाजमाध्यमांविषयी आलेल्या तक्रारी अनेकदा तक्रारदाराच्या परिचित व्यक्तींबाबत असतात. सायबर गुन्ह्यात थेट गुन्हा नोंद केला जात नाही. अशा वेळी जेव्हा तक्रारदारासमोर आरोपी उभा केला जातो, त्यावेळी आरोपीने गयावया केल्यानंतर तक्रारदार तक्रार मागे घेतो. त्याला तक्रार मागे घेऊ  नको म्हणून पोलीस सक्ती करू शकत नाहीत.

*  पारपत्र प्रकरणातही पडताळणीसाठी पत्ता व्यवस्थित न दिल्याने पोलीस कर्मचारी त्या पत्त्यावर संबंधित व्यक्तीला शोधत बसतो. आणि शेवटी ती व्यक्ती आढळून आली नाही, असा शेरा दिला जातो.

सिटिझन पोर्टलवर बहुतांश नेहमीचेच लोक तक्रारी करीत असतात. असे असले तरीही आम्हाला प्रत्येक तक्रारींची गांभीर्याने दखल घेणे हे आमचे कर्तव्य आहे.

-संजयकुमार, पोलीस आयुक्त