नवी मुंबईत फक्त दोन प्रतिबंधित क्षेत्रे

नवी मुंबई</strong> : नवी मुंबईत करोनामुक्तीचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून पाच महिन्यांत  प्रथमच उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली आली आहे. करोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रे १२ वरून दोनवर आली आहेत.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या  ४४ हजार ५०० पेक्षा अधिक झाली असून ९०५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र घट्ट झालेला करोनाचा विळखा हा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. शहरातील दररोज करोनाची ३०० ते ४०० च्या घरात असलेली बाधितांची संख्या आता दानशेपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे करोनामुक्तीचा दर हा ९३ टक्के झाला आहे.

शहरात २ लाख ८२ हजारांच्या वर करोना चाचण्या करण्यात आल्या असून दुसरीकडे रुग्णसंख्या कमी झाल्याने खाटांची उपलब्धताही वाढत आहे. नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या २४ जूनला २ हजाराच्या वर गेली होती. ३ हजार ५००पर्यंत ही संख्या पोहोचली होती. परंतु पाच महिन्यांनंतर दररोज वाढणारे रुग्ण कमी होत असून करोनामुक्त होणारे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ महिन्यांनंतर प्रथमच दोन हजारांच्या खाली आली आहे. करोनामुक्तीचा दर वाढल्यामुळे खाटांची उपलब्धताही वाढली आहे. हे शहरासाठी चांगले संकेत असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पाच महिन्यांतील स्थिती

२३ जून :         १८९४

२३ जुलै  :       ३९८६

२३ ऑगस्ट  :  ३४४९

२३ सप्टेंबर  :  ३५८५

२३ ऑक्टोबर  : २५४८

२९ ऑक्टोबर  : १९०९

१ नोव्हेंबर :    १७५८