उरणच्या पिरवाडी किनारा हा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असताना येथील जुन्या जेटीमुळे अनेकांचे बुडून मृत्यू झाले आहेत. हे प्रकार दरवर्षी घडत असल्याने या जेटीला किलर जेटी असेही नाव पडलेले आहे. ही जेटी हटवून किनारा मोकळा करण्याची मागणी येथील रहिवासी तसेच पर्यटकांकडून केली जात होती. मात्र ती हटविण्यासाठी येणारा खर्च कोणी करायचा हे ठरत नसल्याने अनेक वर्षांपासून जेटी हटविण्याचे काम रखडलेले होते. मात्र ही जेटी हटविण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दिली आहे.
तब्बल चाळीस वर्षांपूर्वी नागाव (पिरवाडी) समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या नैसर्गिक तेलविहिरीतील तेलावर प्रक्रिया करण्यासाठी ओएनजीसीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पासाठी लागणारी साधनसामग्री आणण्यासाठी जहाजांचा वापर करण्यात आला होता. त्या वेळी किनाऱ्यावर तात्पुरत्या जेटीची उभारणी करण्यात आलेली होती. जेटीची उपयुक्तता संपल्यानंतरही ती तेथेच राहिल्याने ओहोटीच्या वेळी जेटीजवळच्या पाण्याच्या प्रवाहात बदल होत होता. यामुळे तेथे निर्माण झालेल्या भोवऱ्यात अडकून अनेक जण बुडून मरण पावल्याच्या घटना घडल्या. यावर उपाय म्हणून जेट्टी हटविण्याची मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने अखेर जेटी हटविण्याच्या कामासाठी २ कोटी रुपयांची निविदा जाहीर केली असून लवकरच ती हटवली जाईल.