पर्यावरण सेवाभावी संघटनेची पालिकेकडे तक्रार

आपल्या दुकानाकडे वा बारकडे लक्ष वेधण्यासाठी सध्या बहुतांश ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र यासाठी झाडांचा वापर सर्रास पाहावयास मिळत असून तो धोकादायक ठरू शकतो. विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांना स्पर्श झाल्यास अपघाताची शक्यता असून  झाडांनाही मारक असल्याची तक्रार येथील एका पर्यावरण सेवाभावी संस्थेने पालिकेकडे केली आहे.

झाडे हे प्राणवायू देण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असतात. मात्र नवी मुंबईतील व्यावसायिकांच्या सणवारात विद्युत रोषणाई करून बार वा दुकानांची शोभा वाढवण्यासाठी झाडे असतात, असा समज झालेला दिसतो. ख्रिसमसनिमित्त झाडांवर मोठय़ा प्रमाणत रोषणाई केलेली दिसत आहे.

पामबीच मार्गावर असलेल्या बार आणि हॉटेलच्या समोर रंगीबेरंगी दिव्यांची माळ झाडांना गुंडाळून आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याविरोधात पर्यावरण सेवाभावी संघटनेने महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून लक्ष वेधले आहे. या संस्थेचे बाळासाहेब शिंदे यांनी या झाडांच्या छायाचित्रासह प्रशासनाला तक्रारी दिल्या आहेत. वन संरक्षण कायद्यातील झाडांच्या संवर्धन कायद्याप्रमाणे महापालिका उद्यान अधिकारी आणि वृक्ष प्राधिकरण याच्यावर कारवाई करू शकते, मात्र तरीदेखील अधिकारी ते टाळत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वाशीमधील व्यापाऱ्यांनीही झाडांना रोषणाई केली आहे.

झाडांसाठी मारक

रोषणाई करण्यासाठी झाडांना सर्रास खिळे ठोकले जातात तसेच ताराही बांधल्या जातात. मात्र या तारा पुन्हा काढल्याच जात नसल्याने झाडांच्या फांद्या वाढताना त्या तारा तुटत नसल्याने फांदीच अचानक तुटून खाली पडते. यातून अपघातही होतात.