नवी मुंबई : ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत बुधवारपासून शहरातील मॉल पुन्हा सुरू झाले. त्यामुळे नवी मुंबईतील प्रमुख मॉलमध्ये पहिल्याच दिवशी मोजक्याच ग्राहकांची पावले विविध दालनांकडे वळली. यावेळी  मॉल व्यवस्थापनाकडून अंतराच्या नियमाचे पालन करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली होती. नवी मुंबईत सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर बुधवारपासून मॉल सुरू करण्यात आले.

सीवूड्समधील ग्रॅण्ड सेन्ट्रल मॉलमध्ये पहिल्या ५० ग्राहकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती मॉल व्यवस्थापक नीलेश सिंग यांनी सांगितले. जोराचा पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे कमी संख्येने ग्राहक आले होते. रघुलीला मॉलमध्येही योग्य ते नियम पाळून व्यवहार सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी ग्राहकांचे प्रमाण कमी होते. पण लोक खरेदी करीत असल्याचे वाशी येथील रघुलीला मॉल व्यवस्थापनाचे संदीप देशमुख यांनी सांगितले.