पालिकेत विरोधक-सत्ताधाऱ्यांची एकजूट

पनवेल महापालिका क्षेत्रात यापुढे हॉटेल आणि दुकानांमध्ये दारूविक्री करण्यास बंदी घालण्यात येण्याची चिन्हे आहेत. तशी लक्षवेधी सूचना पालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडली आहे. पनवेल परिषदेत सभागृहात राजकीय मुद्दय़ांवरून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणाऱ्या नेत्यांनी महासभेत दारूबंदीच्या मुद्दय़ावर एकत्र आल्याचे स्पष्ट झाले.

महामार्गाशेजारी असलेल्या ‘लेडीज बार’चे केंद्र अशी पनवेलची ओळख निर्माण झाली होती. महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर पनवेलमधील पूर्वाश्रमीचे लेडीज बार आजही दारूविना मनोरंजनाच्या नावाखाली पेल्यात फळांचा रस व चहा कॉफीच्या बहाण्याने सुरूच आहेत. काही ठिकाणी नियमांचा दाखला देऊन नोकर परवाने दाखवून चहाच्या पेल्यात दारूचीही विक्री करीत आहेत.

त्यामुळे महासभेत दारूबंदी हा विषय जोरदार गाजला. भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी दारूबंदीची लक्षवेधी मांडली, शेकापने खारघर वसाहतीपुरती दारूबंदी कायम करण्याची मागणी सुरुवातीला केली होती. मात्र भाजपने संपूर्ण पालिका क्षेत्रातच लक्षवेधी मांडली. अ‍ॅड. मनोज भुजबळ, अरविंद म्हात्रे, नितीन पाटील, जगदीश गायकवाड यांनी याबाबतच्या सूचना नोंदविल्या. त्यानंतर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी या लक्षवेधीवर सभागृहाचे एकमत झाल्याचे जाहीर केले. तसेच पालिका प्रशासनाला विधी विभागाच्या व या निर्णयानंतर तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी हा निर्णय तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील महासभेत या निर्णयाचा संपूर्ण प्रस्ताव प्रशासनाने ठेवला जाईल.