नवी मुंबईत या वर्षी ४७५ धोकादायक इमारती

संतोष जाधव

नवी मुंबई : पावसाळा सुरू झाला असून अतिधोकादायक इमारतींची पडझड सुरू झाली आहे. मुंबईत घडलेल्या दुर्घटनेत ११ जणांचा जीव गेला आहे. नवी मुंबईतही हा प्रश्न गंभीर असून दरवर्षी धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. या वर्षी ३२ इमारतींची वाढ होत धोकादायक इमारतींची संख्या ४७५ पर्यंत पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे अतिधोकादायक (राहण्यास अयोग्य) ६५ इमारतींपैकी ४७ इमारतींत नागरिकांचे वास्तव्य आहे.

गेल्या वर्षी भिवंडी इमारत दुर्घटनेत ४० जणांना जीव गमवावा लागला. बुधवारी मुंबईती मालाड परिसरातील दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दरवर्षी इमारत दुर्घटना वाढत आहेत. नवी मुंबईतही या धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाला आहे. अद्याप मोठी दुर्घटना घडली नसली तरी इमारती पडझडीच्या घटना पावसाळ्यात नेहमी होत आहेत.

गेल्या वर्षीच्या पाहणीत शहरात ४४३ धोकादायक इमारती होत्या, तर अतिधोकादायक ६१ इमारती होत्या. नवी मुंबई महापालिकेने अद्याप या वर्षीची धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची यादी अद्याप जाहीर केली नाही. मात्र या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. यात या वर्षी धोकादायक इमारतींची संख्या ही ४७५ इतकी झाली आहे, तर अतिधोकादायक ६५ इमारती आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही प्रकारच्या इमारतीत वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. धोकादायक इमारतींत ३२ने वाढ झाली आहे, तर अतिधोकादायक इमारतींत पाचने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या अतिधोकादायक इमारतींत नागरिकांचे वास्तव्य आहे, हे अधिक धक्कादायक आहे. अशाप्रकारच्या ४७ इमारतींत नागरिकांचे वास्तव्य आहे. अशा इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी धोकादायक इमारतींच्या दुर्घटनेनंतर न्यायालयाकडूनच जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारसह मुंबई, नवी मुंबई महापालिकेसह विविध महापालिकांना धोकादायक इमारतीबाबत तसेच बेकायदा इमारतींबाबत काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येते तसेच,पालिकेकडून या धोकादायक इमारतींची संरचनात्मक पाहणी केली जाते का? याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.

पुनर्बाधणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. त्याला आता कुठे गती मिळाली आहे. मात्र अद्याप हजारो नागरिक धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन राहात आहेत. नवी मुंबई महापालिकेने सर्वेक्षण करून शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. राहण्यायोग्य नसलेल्या अतिधोकादायक इमारतींना नोटीस पाठवून या इमारती खाली करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका