X

भारनियमनाच्या झळा

भारनियमनाची घोषणा होण्यापूर्वीही पनवेलकरांना अघोषित भारनियमन सहन करावे लागत होतेच.

नवी मुंबईकर रोज तीन तास विजेविना; उद्योगांनाही फटका

‘ऑक्टोबर हिट’च्या झळा तीव्र होत असतानाच राज्य वीज महावितरण कंपनीने घेतलेल्या भारनियमनाच्या निर्णयाचा फटका नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील वीजग्राहकांना बसणार आहे. बुधवारपासून या भागांत तीन ते सहा तासांचे भारनियमन लागू झाले आहे. नवी मुंबईत एकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल स्पर्धा आयोजित केली असताना, दुसरीकडे सामान्य रहिवासी मात्र भारनियमनात होरपळणार असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

नवी मुंबईतील निवासी क्षेत्राला आणि औद्य्ोगिक पट्टय़ाला वीज भारनियमनाचा मोठा फटका बसणार आहे. सकाळी ६.३० ते ७.३० व दुपारी १ ते २.३० या वेळेत भारनियमन करण्यात येणार असल्याचे महावितरण अधिकांऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात पुढील सूचना येईपर्यंत भारनियमन सुरूच राहील, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

भारनियमनाची घोषणा होण्यापूर्वीही पनवेलकरांना अघोषित भारनियमन सहन करावे लागत होतेच. आता त्यांचे हाल आणखी वाढणार आहेत. शहरी भागांत तीन ते चार तास आणि ग्रामीण भागांत पाच ते सहा तास वीज बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह उद्योजक आणि व्यापारी हवालदिल झाले आहेत.

गेल्या महिन्यात पनवेलच्या ग्रामीण परिसरात भारनियमन सुरू करण्यात आले होते. गणेशोत्सव व नवरात्रीत ते बंद ठेवण्यात आले, मात्र मंगळवारपासून ग्रामीण भागात पुन्हा नव्याने भारनियमन सुरू केले आहे. महावितरण कंपनीने शहरी ग्राहकांसाठी अ व ब असे दोन वर्ग केले आहेत. वाशी, नेरुळ, बेलापूर, खारघर व सिडको वसाहती असा शहरीभाग यात येतो. यापूर्वी आघाडीच्या कार्यकाळात शहरी भागांत वीज भारनियमन टाळण्यात आले होते. आता मात्र ते लागू करण्यात आले आहे.

शहरी भागांत पहाटे सहा ते साडेसात व दुपारी एक ते अडीच या वेळांत भारनियमन होणार आहे. त्यामुळे पहाटेची झोपमोड होणार आहे. दुपारी या उद्योग व कार्यालयांतील कामे ठप्प होतील. अनेक कार्यालयांवर इन्व्हर्टर खरेदी करण्याची वेळ येणार आहे. ब वर्गवारीमधील ग्राहकांना सकाळी दहा ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते सहा या दरम्यान विजेपासून वंचित राहावे लागेल. ग्रामीण भागासाठी क, ड, ई, फ, ज, अशी वर्गवारी आहे. ज्या फीडरवर जास्त वीजगळती व चोरी होते त्यांचा समावेश ज ते इ या वर्गवारीत आहे. तिथे सुमारे पाच ते सहा तासांचे भारनियमन होणार आहे.

भारनियमनाच्या वेळा

राज्यात वीजनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने लोडशेिडग करण्यात येणार आहे. नवी मुंबईत १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होत आहे, या पाश्र्वभूमीवर भारनियमनावर नियंत्रण राहावे, म्हणून वरिष्ठ अधिकांऱ्याशी चर्चा करण्यात येईल.

विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी महावितरण

भाजप सरकारची व्याख्या करंटे सरकार अशीच करावी लागेल. आघाडीच्या काळात शहरी नागरिकांना हा त्रास भोगावा लागला नव्हता. ऊर्जामंत्र्यांनी दीड महिन्यापूर्वी पनवेलमध्ये जनता दरबार घेतला. त्यामध्ये वीजसंकट टळल्याचा आभास निर्माण केला, मात्र परिस्थिती सुधारली नाही आणि आता तर भारनियमनच लागू झाले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांचे प्रचंड हाल होणार आहेत.

विवेक पाटील, माजी आमदार, शेकाप

विजेअभावी ग्राहकांची कामे वेळेत करता येत नाहीत. महावितरणचे पनवेलचे उपकार्यकारी अभियंता ननावरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाने काम करावे लागते, असे उत्तर दिले. मेक इन इंडियामध्ये वीजच नसल्यास उद्योग जगणार कसे?

मिलिंद गांगल, मालक गांगल मोटार्स, पनवेल

जून ते ऑक्टोबर तळोजा औद्योगिक वसाहतीत रोज दोन ते तीन तास वीज गायब असते. ऊर्जामंत्र्यांपर्यंत सर्वाकडे तक्रारी केल्या आहेत. भारनियमन नसताना विजेच्या लपंडावामुळे १५ टक्के तोटा होत होता. आता बुधवारपासून भारनियमन सुरू झाले आहे. असेच होत राहिल्यास उद्योग नष्ट होतील.

संदीप डोंगरे, अध्यक्ष, तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशन

तळोजा परिसरातील गावांची वीज मंगळवारी रात्री नऊ वाजता गेली आणि बुधवारी सकाळी नऊ वाजता आली. सायंकाळी पाच वाजता गेलेली वीज रात्री नऊ वाजता आली. विमानतळानजीकच्या गावात राहणाऱ्यांची स्थिती गंभीर आहे. शहरांत तीन तास व गावांत आठ तास अशी विषमता का?

बळीराम पाटील, किरवली ग्रामस्थ

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain