News Flash

पाणी द्या! नंतरच मोठे प्रकल्प उभारा

सिडको १४० हेक्टर जमिनीवर मुंबईमधील ‘बीकेसी’च्या धर्तीवर ‘केसीपी’ उभारणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सिडकोच्या खारघर ‘कॉर्पोरेट पार्क’ला नागरिकांचा विरोध

नवी मुंबई : खारघर सेंट्रल पार्कसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनीवर कुर्ला वांद्रेमधील बीकेसी पार्कच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या खारघर कॉर्पोरेट पार्कला येथील नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या विरोधाची पहिली ठिणगी खारघरमधील अभिव्यक्ती संस्थेने टाकली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात अगोदर पिण्याचे पुरेस पाणी द्या! नंतरच मोठे प्रकल्प उभारा असे सुचविले आहे.

खारघरमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत असून उन्हाळ्यात तर येथील नागरिकांना हंडा मोर्चा काढण्याची वेळ येते. या ठिकाणी ९० दशलक्ष पाणीपुरवठा कमी आहे.

नवी मुंबईच्या दक्षिण नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या सिडकोच्या खारघर नोडमध्ये उत्तर नवी मुंबईत झालेल्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न सिडकोने केला आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार लखिना यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या खारघरमधील केवळ रस्ते विस्र्तीण आहेत. याऊलट पिण्याचे पाणी, रस्त्यावरील खड्डे, प्रवेशद्वार, सार्वजनिक शौचालये, बाजारहाट, वाहनतळ, बस आगार, पोस्ट ऑफिस, पोलीस ठाणी, या सार्वजनिक सुविधांचा अभाव आहे. गेल्या अनेक वर्षांत पावसाळ्यात पाणी न साचणाऱ्या खारघरमध्ये यंदा चांगलेच पाणी साचून वाहने तरंगत असल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले आहे. बेसुमार बांधकाम आणि अस्तव्यस्त राडारोडा यामुळे खारघरच्या चारही बाजू व्यापल्या जात असून त्याचे दृश्यपरिणाम खारघरवासीयांना आता भोगावे लागत आहेत. पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष दर वर्षी वाढत आहे. ऐन पावसाळ्यात सेक्टर ३५ सारख्या भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. विस्र्तीण रस्ते आणि मोकळ्या जागेमुळे या भागात घर घेणाऱ्यांची सख्या अलीकडे वाढली होती. त्यामुळे दहा-बारा वर्षांत या उपनगराची संख्या दीड लाखांच्या घरात गेली आहे. सिडकोने गोल्फ कोर्ससारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प या भागात उभारला आहे पण तो सध्या सुप्तावस्थेत पडला आहे. याशिवाय ८० हेक्टर जमिनीवर इंगल्डमधील हाइड पार्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क बांधण्यात आला आहे पण त्याचीही सध्या दुरवस्था झाल्याचे दिसून येते. अनेक समस्यांनी वेढलेल्या उपनगराच्या मध्यवर्ती भागात सिडको १४० हेक्टर जमिनीवर मुंबईमधील ‘बीकेसी’च्या धर्तीवर ‘केसीपी’ उभारणार आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात आला असून कॉपरेरेट जगतातील व्यवसायिकांना त्यांच्या मनाप्रमाणे कार्यालयाची बांधणी करता येणार आहे. जवळच सुरू होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे या वाणिज्यिक संकुलाकडे कॉर्पोरेट जग आकर्षित होईल असा सिडकोचा दावा आहे. येथील भूखंडाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्याला येथील ३६ सेक्टरमधील नागरिकांनी वेळीच विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना लिहिलेल्या पत्रात या बीकेसी २ प्रकल्पाला विरोध दर्शविण्यात आला आहे. अगोदर पायाभूत सुविधा पूर्ण करा; त्यानंतरच मोठय़ा प्रकल्पांना हात घाला असा इशाराच या नागरिकांनी दिला आहे.

औद्योगिक वसाहतीत प्रकल्प उभारा

‘टीटीसी’ औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग शेवटच्या घटका मोजत असून एमआयडीसीतील मोकळ्या जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात यावा, यासाठी नागरी वसाहतीचा भाग वापरण्याची आवश्यकता काय? असा सवाल या नागरिकांनी केला आहे. दीड लाख लोकवस्तीच्या उपनगराला ये-जा करण्यासाठी अधिकृत एकच प्रवेशद्वार आहे, हे कोणत्या नियोजनात बसते. वादग्रस्त कोंढणे धरणाचे पाणी महामुंबईकरांपर्यंत कधी पोहचणार, हेटवणे धरणाची दुरवस्था जगजाहीर असून ऐन उन्हाळ्यात पंप बंद पडण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे पूर्ण विकास होत नाही तोपर्यंत नवीन बांधकामाला परवानगी देण्यात येऊ नये, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. या मोठय़ा प्रकल्पामुळे पाणथळ व खारफुटीच्या जागाही नामशेष होत असल्याचा आरोप या रहिवाशांचा आहे.

कोटय़वधी किमतीत भूखंड विकणारी सिडको येथील रस्त्याच्या दुरुस्तीवर काही लाख रुपये खर्च करू शकत नाही. खारघरमध्ये पाणी भरण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. उपनगराला एकच प्रवेशद्वार ही तर सिडको प्रशासनाच्या अकलेची दिवाळखोरी आहे. त्यामुळे आमचा नवीन प्रकल्पांना विरोध असून सिडकोने पूर्ण सुविधा देण्यापूर्वी हा प्रकल्प सुरू केल्यास नाईलाजास्तव न्यायालयात धाव घ्यावी लागेल.

– दीपक सिंह, ध्यक्ष, अभिव्यक्ती, खारघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 2:53 am

Web Title: local residents opposed to kharghar corporate park zws 70
Next Stories
1 एपीएमसी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार!
2 उत्पन्नासाठी उरण, पनवेलकडे धाव
3 नवी मुंबई ते मुंबई ‘हावरक्रॉप्ट’ सेवा जूनपासून
Just Now!
X