नवी मुंबईत किराणा मालासाठी प्रतीक्षा; दूध, भाजी मिळणेही दुरापास्त

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई पालिका हद्दीत दुकानांतून थेट विक्रीस मनाई करण्यात आल्यानंतर नागरिकांच्या अडचणींत भर पडली आहे. त्यात पोलिसांनी अत्यावश्यक सेवांच्या बाबतीतही स्वत:चे नियम लावल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याचा घाऊक बाजारावर परिणाम होत आहे. या साऱ्या स्थितीबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत जितका त्रास झाला नाही, त्याहून किती तरी पटीने समस्या नव्याने लागू केलेल्या टाळेबंदीत होत आहे. करोनासंसर्गाची साखळी तोडण्यासाठी जरूर उपाययोजना करण्यात याव्यात; परंतु टाळेबंदीसारखा जालीम उपाय केला जात असल्याने युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांचे जसे हाल होतात, तसे आता होत आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

नवी मुंबईतील टाळेबंदी १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात अर्थात ३ जुलैपासून किराणा मालाची छोटी दुकाने उघडी ठेवण्याची मुभा नवी मुंबईत देण्यात आली. मात्र, पोलिसांनी काही ठिकाणी सरसकट कारवाई केल्याने नागरिकांना दुकानांतून थेट खरेदी करता येणे शक्य झाले नाही. तीच बंधने भाजी दुकानांवरही घालण्यात आली. त्याऐवजी घरपोच सेवा देण्याच्या सूचना पालिकेने केल्या. दुकानदार ऑनलाइन सेवा पुरविण्यास तयार आहेत. मात्र, पोलीस त्यासाठी दुकान उघडण्याची मुभाच देत नाहीत. त्यामुळे त्यांना ही सेवा पुरवायची कशी, असा सवाल काहींनी केला आहे. घरपोच सेवा मिळत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत.

मॉल वा सुपर मार्केटसारख्या आस्थापनांना दर्शनी भागात एक आणि मागील भागात दोन ते चार दरवाजे असतात. दर्शनी भाग बंद ठेवून अन्य दरवाजाने आत प्रवेश करून मालाची घरपोच सेवा देता येणे शक्य होते. मात्र, छोटय़ा दुकानदारांना एकमेव दरवाजातून अशी व्यवस्था पुरवणे शक्य होत नाही. पोलिसांनी छोटय़ा दुकानदारांना दुकानाचा दरवाजा उघडण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे घरपोच सेवा दुकानदारांना देता आलेली नाही.

‘दुजाभाव का?’

कोपरखैरणत दूध एजन्सी तसेच मोठी डेअरी दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र छोटय़ा डेअरी मालकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. बेकरी व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, डेअरीत बेकरी उत्पादने विकली जात असल्याची ओरड बेकरीचालक करीत आहेत.

मार्गावरोधक रस्त्यातच

सकाळी आठ ते दुपारी एक ते दीड या कालावधीत शहरात २२ ठिकाणी लावलेली नाकाबंदी आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी लावण्यात आलेले मार्गावरोधक (बॅरिकेड्स) नाकाबंदी उठल्यानंतर हटवले जात नाहीत. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास काही हरकत नाही. तसेच रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रिक्षांना परतीच्या प्रवासात होणारा त्रास आणि नाकाबंदीतील त्रुटींबाबत पूर्ण माहिती घेऊन योग्य त्या सूचना देण्यात येतील.

– पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त