पनवेलमध्ये किराणा दुकानांना पोलिसांकडून टाळे; भाज्यांची तिप्पट दराने विक्री

पनवेल : करोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी पनवेल पालिका हद्दीत नव्याने लागू केलेल्या टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात दाणागोटा बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी मध्यरात्री दहा दिवसांची टाळेबंदी संपुष्टात येण्याच्या काही तास आधी पनवेल पालिका प्रशासनाने मंगळवारी २४ जुलैपर्यंत दुसऱ्या टाळेबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंच्या शोधात वणवण फिरणाऱ्या नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

पहिल्या टप्प्यातील दहा दिवसांच्या टाळेबंदीत पुरेल इतके खरेदी केलेले वाणसामान आता संपत चालले आहे. त्यात मंगळवारी पालिका प्रशासनाने दुकानांतून थेट विक्री करण्यास मनाई केल्याने दुकानदारांनी घरपोच सेवा देण्याचा पर्याय टाळून दुकाने बंद ठेवली. त्यामुळे काय शिजवावे, असा प्रश्न गृहिणींना पडला होता.

टाळेबंदी वाढविण्याचा जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर पनवेल पालिका हद्दीत आधीची नियमावली कायम ठेवण्यात आली. याचा फायदा काही नफेखोरांनी घेत तिप्पट दराने भाजी विकण्यास सुरुवात केली. पालिका हद्दीत बहुतेक ठिकाणी भाजी विक्रेत्यांचे पेव फुटलेले होते. यात काहींनी रिक्षातच भाजी विक्री सुरू केली होती. या वेळी काहींनी रांगा लावून भाजी खरेदी केली. यात काही विक्रेते सडलेल्या भाज्या विकत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. भाजी संपेल या भीतीने काही ठिकाणी गर्दी झाली होती.

अनेक ठिकाणी दुकाने बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्ण बंद आहे. तर काही ठिकाणी भाजीविक्रेते पदपथावरून बसून भाजी विकत असल्याचे दिसून आले. गेले काही दिवस शहरात सर्वत्र दुधाचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र, मंगळवारी दूधही मिळणार नाही, या भीतीने अनेकांनी रांगा लावल्या, तर काहींनी गर्दी केली होती. सकाळी दूध घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खारघर, कळंबोली, कामोठे आणि इतर वसाहतींमध्ये दूध डेअरीवर गर्दी पाहायला मिळाली.  काहींनी सामाजिक अंतर राखून खरेदी केली. मात्र पोलिसांच्या भीतीने अनेक जण बाहेर पडले नाहीत.

योजना नाही; पण कारवाई जोरात

पनवेल पालिका प्रशासनाने सूमारे आठ लाख लोकवस्तीच्या परिसरात टाळेबंदीला मुदतवाढ देण्यासोबत तेथील अत्यावश्यक वस्तू माफक दरात मिळावी या नियंत्रणासाठी कोणतीही योजना आखलेली नाही. उलट फिरती पथके नेमून दुकानांचे दरवाजे अर्धवट उघडे ठेवणाऱ्यांवर कारवाईचा धडाका पालिकेने लावला आहे. नव्याने लादण्यात आलेल्या दहा दिवसांच्या टाळेबंदीत पालिका हद्दीत महागाई वाढल्याचे नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे. खासगी कंपन्या, कार्यालये बंद असल्याने वाढलेल्या महागाईत भाजी, धान्य खरेदी करण्यासाठी नागरिक घरात बसून पैसे कुठून आणणार, असा प्रश्न अनेक कुटुंबांना पडला आहे.

‘भाजीसोबत काय शिजवू?’

टाळेबंदीच्या अंमलबजावणीने भांबावलेल्या एका महिलेने वाणसामान आणण्यासाठी दुकानांचा शोध सुरू केला, मात्र ते न मिळाल्याने उपास घडण्याची भीती व्यक्त केली. पदपथावर भाजी मिळत आहे. पण, तेवढीच शिजवून उपयोग काय, त्या भाजीसोबत खाण्यासाठी काहीतरी शिजवावं लागेल. ते कसं शिजवू, असा सवाल केला. प्रशासनाने टाळेबंदीत वाणसामान घरपोच मिळेल, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, हा प्रयोग पालिका हद्दीत पूर्णत: फोल ठरला आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची चढय़ा दराने खरेदी करावी लागली. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

सडक्या भाज्या

भाजीपाला विक्रेत्या संघटनेच्या प्रतिनिधींना याबाबत विचारल्यावर भाजीचे दर हे मालाच्या बाजारातील आवक आणि मागणीवर ठरतात. त्यामुळे घाऊक बाजारातील दरांवर कोणताही परिणाम झालेला नाही. पनवेल पालिका क्षेत्रात खांदेश्वर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तात्पुरत्या उभारलेल्या बाजारामध्ये पहाटे किरकोळ भाजीविक्रेते भाज्या घेऊन शहरात ठिकठिकाणी जात आहेत. भाजी घरपोच देण्याच्या नावाखाली दरात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. यात काही नागरिकांनी सडलेल्या भाज्यांचा पुरवठा केला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

निव्वळ अडवणूक

टाळेबंदीशिवाय अन्य उपाय नाही, असे पालिकेच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र सामाजिक अंतर, मुखपट्टय़ा अशा उपायांचे तंतोतंत पालन केल्यास नागरिकांना दुकानांवरूनच जीवनाश्यक वस्तू पुरवता येतील. याबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे लागेल. नव्या टाळेबंदीत व्यापाऱ्यांचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे.

– कीर्ती राणा, अध्यक्ष घाऊक व्यापारी नवी मुंबई र्मचट असोसिएशन

पिठाची गिरणी बंद ठेवण्यास सांगितले. मात्र, मॉलमधील गिरणी सुरू आहेत. टाळेबंदी फक्त छोटय़ा व्यावसायिकांसाठीच आहे का?

– देवीदास चौधरी, गिरणीचालक

आजवर मेडिकल चालक वा किराणा दुकानदाराला करोना झाल्याचे ऐकिवात नाही. मुळात आता सामाजिक अंतराचे भान, मुखपट्टय़ांबाबत बहुतांश नागरिक जागरूक आहेत. किराणा दुकाने ऑनलाइन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने अधिकचा साठा केला नाही. आता टाळेबंदीला मुदतवाढ दिल्यानंतर काही दिवसांनी वस्तू संपणार आहेत. मोठी दुकानांमधील वस्तू तीन दिवसांनी घरी येतात. त्यातही जास्त मागवले तरच लवकर वस्तू पुरवल्या जातात. छोटी किराणा दुकाने, दूध डेअरी सुरू ठेवणे आवश्यक आहे. दूध डेअरीदेखील बंद करण्यात आल्या आहेत.

– कीर्ती देशपांडे, गृहिणी

नाकाबंदी रिक्षाचालकांच्या मुळावर आली आहे. आजघडीस किमान ३०० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना नेमका किती दंड आकारण्यात आला आहे याबाबत पोलीस मौन बाळगून आहेत. रुग्णाला रिक्षात रुग्णालयात घेऊन जाताना पोलीस अडवत नाहीत. मात्र, परतीच्या प्रवासात अडवणूक केली जाते. हा प्रकार न पटण्यासारखा आहे. 

– दिलीप आमले, अध्यक्ष, नवी मुंबई रिक्षा चालकमालक संघटना