15 August 2020

News Flash

‘लॉकर रूम’बाबत बँकांकडून नियम धाब्यावर?

जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबरमध्ये दरोडा पडला होता.

(संग्रहित छायाचित्र)

|| शेखर हंप्रस

सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप; भरपाईसाठी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल

सोनेचांदीचे दागिने किंवा महत्त्वाचे दस्तावेज घरातल्या चार भिंतींमध्ये सुरक्षित राहू शकत नाहीत, या विचाराने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणाऱ्या खातेदारांच्या चीजवस्तूंच्या सुरक्षेबाबत बँकांकडून ढिलाई होत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदामधील लॉकर रूममध्ये दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दरोडय़ाला संबंधित बँकेची हलगर्जीही जबाबदार असल्याचा आरोप करत एका खातेदाराने भरपाईची मागणी करत ग्राहक मंचाचे दार ठोठावले आहे. केवळ हीच बँक नव्हे, तर अनेक बँकांमध्ये लॉकर रूमबाबत आखून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबरमध्ये दरोडा पडला होता. चोरटय़ांनी बँकेची शाखेशेजारी असलेल्या दुकानातून शाखेपर्यंत भुयार खणून त्याद्वारे बँकेत प्रवेश केला व लॉकर रूम फोडून जवळपास साडेतीन कोटींचा ऐवज लंपास केला. याप्रकरणातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असली तरी या लॉकरमध्ये मौल्यवान ऐवज मिळालेले अनेक जण अद्याप भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळेच दरोडय़ाच्या घटनेनंतर दोन वर्षांनी सचिन गव्हाणे आणि त्यांच्या अन्य एका सहकाऱ्याने याप्रकरणी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. लॉकर रूमच्या व्यवस्थेबाबत आखून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्यामुळेच बँकेवर   दरोडा यशस्वी होऊ शकला. परिणामी या घटनेला बँकही जबाबदार असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या प्रकरणात तक्रारदारांनी माहितीचा अधिकार वापरून तसेच बँकेतील काही कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मिळवलेल्या माहितीनुसार केवळ हीच बँक नव्हे तर अन्य बँकांमधील लॉकर रूमही सुरक्षित नसल्याचा दावा तक्रारदारांचे वकील अ‍ॅड. स्वप्निल कदम यांनी केला आहे. बँक ऑफ बडोदातील घटनेबाबत बोलायचे झाल्यास बँकेच्या लॉकर रूममध्ये कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई असताना चोरटय़ांनी टेहळणीसाठी चक्क पेन कॅमेऱ्याचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे ते म्हणाले.

बँकांच्या लॉकर रूमच्या उभारणीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने नियम आखून दिले आहेत. त्यानुसार लॉकरच्या चारही भिंती बँकेच्या चार भिंतींच्या आतल्या बाजूस असणे आवश्यक आहे. लॉकर रूम आणि बँकेच्या शाखेशेजारील बांधकाम यांच्यात सामाईक भिंत असता कामा नये, लॉकर रूममध्ये येणाऱ्याजाणाऱ्यांची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून नोंद करणे आवश्यक आहे, लॉकर रूममधील जमिनीचा पायाही मजबूत असणे आवश्यक आहे. तसेच लॉकर रूमबाहेर सातत्याने सुरक्षारक्षक तैनात ठेवणे आणि आतमध्ये अलार्म यंत्रणा असणे बंधनकारक आहे. मात्र, यातील अनेक नियम नवी मुंबईतील बँकांकडून पायदळी तुडवले जात असल्याचे अ‍ॅड. कदम यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेकडूनही या बँकांच्या लॉकर रूमची तपासणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, यासंदर्भात बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

दरोडय़ाचे प्रकरण

१३ नोव्हेंबर २०१७ रोजी जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत दरोडा टाकण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासणीत बँकेच्या लॉकर रूममध्ये भुयार खणून चोरटय़ांनी प्रवेश केल्याचे उघड झाले. हे भुयार शाखेच्या गाळय़ापासून चार गाळे सोडून असलेल्या दुकानातून खणण्यात आले होते. चोरटय़ांनी एकूण ३१ लॉकर फोडून त्यातील तब्बल तीन कोटी ४३ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत या प्रकरणातील आरोपींना अटक केली. हाजीद अली सबदर अली मिर्झा बेग ऊर्फ अज्जु ऊर्फ लंगडा, श्रावण कृष्णा हेगडे ऊर्फ संतोष तानाजी कदम ऊर्फ काल्या, मोमीन अमिन खान ऊर्फ पिंटू, अंजन आनंद महांती ऊर्फ रंजन अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडील सोने खरेदी करणारा सोनार राजेंद्र वाघ यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून १७ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले.

बहुतांश शाखा भाडय़ाच्या जागेत

नवी मुंबईत जवळपास सर्वच बँकांच्या शाखा आणि कार्यालये आहेत. मात्र, यातील बहुतांश शाखा या भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाळय़ांमध्ये वा इमारतीत आहेत. अशा ठिकाणी बँकेच्या सुरक्षिततेसंदर्भात शाखेच्या संरचनेत आवश्यक बदल करणे शक्य होत नाही, अशी माहिती बँक क्षेत्राशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.

बँकांची जबाबदारी नाही

बँकेचे लॉकर  करारपत्रातील अटी व शर्तीचा बहुतांश खातेदार अभ्यास करत नाहीत. लॉकरमधील ऐवजाचे नुकसान वा चोरीची जबाबदारी बँकेची नसल्याचेही त्यात नमूद करण्यात येते. मात्र, या अटी न वाचताच खातेदार त्यावर स्वाक्षरी करतात. हेच करारपत्र पुढे बँकांना खातेदारांना भरपाई नाकारण्यासाठी उपयोगी पडते, अशी माहिती अ‍ॅड. कदम यांनी दिली.

बँक, संस्था, सराफांच्या पेढय़ा यांच्यासाठी सुरक्षेविषयक सल्ला पोलिसांकडून नेहमीच देण्यात येत असतो. बँकांनाही एटीएममध्ये सुरक्षा रक्षक ठेवण्यासाठी सूचना केल्या जातात. सीसीटीव्हीबाबतही सूचना केल्या जातात, त्यावर संबंधितांनी कार्यवाही करणे अपेक्षित असते.  -पंकज डहाके, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:02 am

Web Title: locker room bank complaint consumer forum akp 94
Next Stories
1 जोखीमरहित गुंतवणुकीतून आकर्षक परतावा कसा?
2 नवी मुंबईचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी
3 पावसामुळे फळांचा हंगाम महिनाभर लांबणीवर
Just Now!
X