नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये लवकरच ‘लॉकर्स’ची सुविधा

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

नवी मुंबईतील पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना शाळेतच ‘लॉकर्स’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ही सोय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत पटलावर घेण्यात येणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ‘लॉकर्स’ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभाग अधिकाऱ्यांनी दिली. २१ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार शाळेत ‘लॉकर्स’ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सुविधेनुसार पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य या ‘लॉकर्स’मध्ये ठेवता येणार आहे.

प्राथमिक शाळांमध्ये एकूण ३० हजार ३४३, तर माध्यमिक शाळांमध्ये पाच हजार ४४३ असे एकूण ३५ हजार ७८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानुसार प्रति विद्यार्थी ‘लॉकर्स’ या योजनेनुसार तीन हजार रुपये असा खर्च आहे. यासाठी एकूण दहा कोटी ७३ लाख ५८ हजार रुपये खर्च येणार आहे. असे पाऊल उचलणारी नवी मुंबई पालिका ही पहिली पालिका ठरेल, असा दावा पालिकेने केला आहे.

दप्तरांसाठी सुविधा अशी..

‘लॉकर्स’ गोदरेज लहान कपाटाच्या उंचीचे असतील. विद्यार्थ्यांच्या शारीरिक उंचीनुसार याचे नियोजन करण्यात येणार आहे. ‘लॉकर्स’ जाड पत्र्याचे आणि चकचकीत असतील. त्यामुळे याला गंज चढणार नाही. एक ते सव्वा एक फूट उंच आणि दीड फूट खोल असे ‘लॉकर्स’ असतील. ‘लॉकर्स’ प्रत्येक वर्गात पटसंख्येनुसार ठेवण्यात येतील. शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्के दप्तराचे ओझे असावे, असा दंडक आहे. म्हणजे साधारण दोन ते तीन किलो असावे. मात्र विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे १० ते १२ किलो असते. उपलब्ध करून दिलेल्या ‘लॉकर्स’मध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे संपूर्ण दप्तर ठेवता येणार आहे. प्रत्येक विषयाची पुस्तके, वही, डब्बा, पाण्याची बाटली ठेवता येईल, असे नियोजन आहे, असे पालिकेचे अतिरिक्त शिक्षण अधिकारी नितीन काळे यांनी दिली.