पनवेल : मावळ मतदारसंघात पनवेलमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. पनवेल परिसरातील खांदा वसाहतीतील एका नवरदेवाने आधी मतदान नंतरच लग्न, अशी भूमिका घेत हळदीच्या अंगाने मतदान केले. या केंद्रावर हा नवरदेव कुतूहलाचा विषय झाला होता.

खांदा वसाहतीतील महात्मा स्कूलमधील मतदान केंद्रावर अजिंक्य डावलेकर हा तरुण मतदान करण्यासाठी आला होता. अंगाला हळद, पेहराव हळदीने माखलेला, डोक्यात हळदीची टोपी व कपाळावर बांधलेल्या रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या यामुळे तो लक्ष वेधून घेत होता.

अजिंक्य खांदा वसाहतीमधील सेक्टर १ येथील सुयोग अपार्टमेंट येथे राहतो. लग्न समारंभस्थळी जाण्यापूर्वी त्याने थेट मतदान केंद्र गाठले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सायंकाळी श्वेता या मुलीशी तो विवाहबद्ध झाला.

कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. खरे पाहता हळदीच्या अंगाने वर किंवा वधू घराबाहेर पडत नाहीत, मलाही मज्जाव करण्यात आला. मात्र प्रथम मतदान महत्त्वाचे असल्याने हळदीच्या अंगाने बाहेर पडलो.

– अजिंक्य डावलेकर (वर)