मुंबई/ पनवेल : पुत्र पार्थ यांची मावळ मतदारसंघातील उमेदवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गांभीर्याने घेतलेली दिसते. पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हजेरी लावत आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पार्थ पवार यांची उमेदवारी सध्या गाजत आहे. पार्थच्या उमेदवारीकरिता शरद पवार यांना माढा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली.  मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

या पाश्र्वभूमीवर अजितदादा हे काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. यामुळे त्यांनी उमेदवार म्हणून पार्थचे नाव घेण्याचे टाळले. आघाडीच्या उमेदवाराला मदत करा,असे आवाहन केले. पनवेल, उरण पट्टय़ांमध्ये शेकापची ताकद चांगली असल्याने शेकापच्या मेळाव्याला अजितदादा उपस्थित राहिले.

पार्थ पवार यांना पनवेल, उरण, कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघातून एक लाख मतांची आघाडी मिळेल, असा विश्वास शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. शेकापच्या शेतकऱ्यांविषयीच्या तळमळीचे कौतुक करीत अजितदादांनी त्यामुळे निवडणूक काळात गाफील राहू नका, असा सल्लाही शेकाप कार्यकत्यांना दिला.