वाशीमध्ये आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’; खास गुंतवणूक मार्गदर्शन, सर्वासाठी प्रवेश खुला

सार्वकालिक उच्चांकी टप्प्यावर पोहोचलेला भांडवली बाजार, कर व्यवस्थेतील संक्रमण ठरलेल्या वस्तू व सेवा करप्रणालीचा महिन्याभरातील अनुभव, एकंदर देशाची अर्थव्यवस्था कलाटणी घेत नव्या कक्षेत प्रवेश करीत असताना आपल्या बचत आणि गुंतवणुकीला नवीन अपेक्षित उंची गाठता येईल काय? गुंतवणूकदारांच्या मनातील साशंकतेचे सुयोग्य निरसन रविवारी सायंकाळी वाशीमध्ये आयोजित ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून तज्ज्ञ सल्लागारांकडून केले जाणार आहे.

अर्थसाक्षरतेच्या उद्दिष्टाने आयोजित ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकदार मार्गदर्शनाचे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे सत्र रविवार, ६ ऑगस्ट २०१७ रोजी, सायंकाळी ६ वाजता मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.

गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन कसे करावे यावर वित्तीय सल्लागार प्रा.  कौस्तुभ जोशी मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची ओळख, त्यांची जोखीम, कर दायित्व व परतावा वैशिष्टय़े याबाबी आपल्या पैशाचे नियोजन करताना प्रत्येकाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

शेअर बाजाराच्या निर्देशांकांचा पारा निरंतर चढत जात विक्रमी कळसाला पोहोचला आहे. यातून या पर्यायाबाबत गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण निर्माण झाले असले, तरी यंदा बहुतांश गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमार्फत बाजारात गुंतवणुकीचा सूज्ञ निर्णय घेतल्याचे दिसते. म्युच्युअल फंडाची वाढलेली गंगाजळी हे दाखवून देते. याच लोकप्रिय ठरलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या खुबी आणि बारकाव्यांबाबत ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील. उपस्थितांना या निमित्ताने आपल्या मनातील प्रश्नांचे थेट तज्ज्ञांकडून उत्तरे मिळवून निरसन करण्याची संधी मिळणार आहे. तर मग बदलत्या आर्थिक पर्यावरणात चांगल्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त लाभ मिळविण्याचा प्रवास ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या साथीने निर्धोक व विनासायास बनविण्यासाठी जरूर उपस्थिती दर्शवा.