‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमात सिडको कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

निवृत्तीनंतरची जीवनशैली सुखकर करण्यासाठी प्रत्येकाला पैसा हा लागणारच आहे. तेव्हा त्याची तजवीज आतापासून करण्याची आवश्यकता असून पैसा हा केवळ गुंतवणुकीनेच वाढू शकणार आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडातील गुतंवणूक म्हणजे पैशाने पैसा कमावण्याचा राजमार्ग असल्याचा ‘अर्थसल्ला’ रिलायन्स म्युच्युअल फंडाचे विपणनप्रमुख संदीप वाळुंज यांनी दिला. तर, देशात भागधारकांची अत्यल्प संख्या लक्षात घेता प्रत्येक गुंतवणूकदारांनी डीमॅट खाते सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे सीडीएसएलच्या आर्थिक साक्षरता विभागाचे प्रमुख अजित मंजुरे यांनी सांगितले.

म्युच्युअल फंडविषयी जनजागृती करणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही आहे’ प्रस्तुत व सीडीएसएल या डिपॉझिटरी सेवा संस्थेचे सहप्रायोजकत्व असलेला ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा गुंतवणूकपर मार्गदर्शनपर उपक्रम मंगळवारी बेलापूरच्या सिडको भवनात पार पडला. सिडको एम्प्लॉइज युनियनच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. उपस्थित गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्यातील दुवा बनत सुनील वालावलकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीने विमा संरक्षण मिळते का, कर किती वाचेल अथवा भरावा लागेल यासारख्या अनेक प्रश्नांची वाळुंज व मंजुरे यांनी उत्तरे दिली.

वाळुंज म्हणाले, वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी म्युच्युअल फंड ही एक चांगली गुंतवणूक आहे. पैशाची वृद्धी केवळ बचत करून होणार नाही तर ती गुंतवणुकीने होणार आहे. १२६ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात केवळ साडे तीन कोटी डीमॅट खातेधारक असून म्युच्युअल फंडांतून पैशाचे झाड लावता येईल, असा सल्ला मंजुरे यांनी यावेळी दिला. डीमॅट खाते सुरू केल्याने आपल्या सर्व प्रकारच्या आर्थिक उत्पन्नाची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने नियोजनासही ते उपयुक्त ठरले, असे ते म्हणाले.

सिडकोच्या पणन व्यवस्थापक विद्या तांबवे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्रार्यक्रमाची सुरुवात झाली. सिडको एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील यावेळी उपस्थित होते. आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने आयोजित ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचे उभयतांनी कौतुक केले. यापूर्वी म्हाडा, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच मंत्रालय कर्मचाऱ्यांकरिता हा उपक्रम योजण्यात आला आहे.