मूर्ग वाजिद अली, ग्रिल किंग फिश विथ लेमोनेड सॉस, रोस्ट चिकन विथ मशरूम सॉस, बाल्सामिक चिकन सलाड, पेन पास्ता अरबिटा सॉस, पाल्महाऊस पिझ्झा, चिकन स्टॅक विथ डेमिग्लेज सॉस, ग्रिल्ड फिश बास विथ लेमन बटर सॉस.. या पदार्थाची नावे तुम्हाला ठाऊक आहेत? कधीही ऐकली नसतील असे रसना तृप्त करणारे आगळेवेगळे सामिश आणि निरामिश पदार्थ मिळतात, कल्याणच्या ‘कशीश इंटरनॅशनल’ या उपाहारगृहात. राजेशाही थाट असलेल्या या उपाहारगृहात विविधांगी सजावट करून हे आगळेवेगळे पदार्थ आपल्यासमोर पेश केले जातात. अनोखी सजावट आणि तोंडाला पाणी सुटेल असे चमचमीत पदार्थ पाहून आपणही हरखून जातो आणि उदरशांतीसाठी या पदार्थावर ताव मारतो.

कल्याण पूर्वेला कल्याण-मलंगगड रस्त्यावर नांदिवली गावात स्थानिक बांधकाम व्यावसायिक संजय गायकवाड यांनी हे हॉटेल सुरू केले. एखादे तारांकित हॉटेल वाटावे, अशा प्रकारची शाही सुविधा या हॉटेलात आहे. हॉटेलमधील उपाहारगृह तर शनिवार-रविवार खवय्यांनी भरून गेलेले असते, कारण या उपाहारगृहात मिळणारे आगळेवेगळे पदार्थ त्यांना साद घालत असतात. अगदी आगरी पदार्थापासून पंजाबी, गुजराती, मारवाडी, तंदूर, चायनीज, चाट अशा विविध प्रकारांतील सामिश आणि निरामिश पदार्थ येथे खवय्यांची भूक भागवतात.

परिसरातील खवय्यांना तेच ते पदार्थ देण्यापेक्षा काही तरी वेगळे द्यायचे, या उद्देशाने या उपाहारगृहातील मुख्य शेफ मारुती पवार यांनी हे आगळेवेगळे पदार्थ तयार करण्याचा निर्णय घेतला. मूर्ग वाजीद अली हा पदार्थ सध्या येथील खवय्यांमध्ये अधिकच लोकप्रिय होत आहे. चिकनचे रोल आणि त्याच्या आतमध्ये खिमा, सोबत ऑम्लेट व पापड असलेला हा पदार्थ समोर आला की त्याची देखणी सजावट पाहूनच नयन तृप्त होतात आणि मग जिव्हा तृप्तीसाठी त्यावर ताव मारण्यास आपण आतूर होतो.

शाकाहारी पदार्थामध्ये वेज असोर्टेड तंदुरी प्लेटर हा पदार्थ तुम्ही मागवला तर एका वेगळय़ाच आकाराच्या डिशमधून हा पदार्थ सादर केला जातो. देशी-विदेशी भाज्या तंदूर करून दिल्या जातात. ज्यामध्ये बेबी कॉर्न, मशरूम, प्लॉवर, बेबी पोटॅटो, ब्रोकोली, कॅपशियम क्यूब्ज, पनीर आदी दिले जाते. चटकदार असलेला हा पदार्थ कधी संपतो, हे खवय्यालाही समजत नाही.

विशेष म्हणजे, या पदार्थाना वेगळी चव यावी म्हणून खास मसाल्यांचा वापर केला जातो. शेफ मारुती पवार या मसाल्यांकडे विशेष लक्ष देतात. काही मसाला बाहेरून मागवला जातो, पण बहुतेक मसाला उपाहारगृहातच तयार केला जातो. खवय्यांना पदार्थाबरोबरच नेहमीचे सॉस देण्यापेक्षा काही तरी वेगळय़ा प्रकारचा सॉस देण्याकडे पवार यांचा कल असतो. त्यासाठीच लेमन बटर सॉस, रेड वाइन सॉस, अराबिटा सॉस, मशरूम सॉस तयार करून ते दिले जातात. पदार्थ बनवल्यानंतर तो कसा सजवायचा आणि ग्राहकांपुढे कसा सादर करायचा याची सर्व तयारी पवार करतात.

या उपाहारगृहात चमचमीत पदार्थ मिळतातच, मात्र उपाहारगृहाचे राजेशाही सौंदर्यही डोळे दीपवून टाकते. शाही आसने, मिणमिणते दिवे, प्रत्येक आसनासमोर लावलेली चित्रे पाहून आपणही हरखून जातो. केवळ ‘उदरम् भरणम्’ हा एकच उद्देश न ठेवता पंचेद्रियांना खूश करणारे मिष्टान्न येथे मिळते. पोटोबांना खूश केलेला खवय्या तृप्तीची ढेकर देतच या उपाहारगृहातून बाहेर पडतो.

हनीमून कॉम्बो आइस्क्रीम

हनीमून कॉम्बो आइस्क्रीम.. नावच किती रोमँटिक आहे ना! या नावावरूनच हे आइस्क्रीम मागवण्याचा मोह होतो. पाच प्रकारचे आइस्क्रीम यामध्ये दिले जातात, त्यात तीन प्रकारचे क्रश सोडले जातात. वर ड्रायफ्रूट, चेरी लावून खव्यांना दिले जाते.

कशीश इंटरनॅशनल

कुठे?- कल्याण-मलंगगड रोड, अनमोल गार्डनजवळ, नांदिवली, कल्याण पूर्व