26 February 2021

News Flash

व्यक्तिगत विकासासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही!

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमाला शुक्रवारी वाशीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. (छाया-नरेंद्र वास्कर)

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन
करिअर म्हणजे व्यक्तिगत संकुचित विकास नसून त्यासाठी समूहांच्या विकासाचा विचार करून करिअर घडविण्याची गरज आहे. सध्याचे करिअर हे व्यक्तिकेंद्रित आणि समूह यांच्याबरोबरचे करिअर होऊ पाहत आहे. खरं करिअर करायचं असेल तर बहुरंगीरूपी बुद्धी असणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे जगातील कोणतेही क्षेत्र एका व्यक्तीचे राहिलेले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शुक्रवारी वाशीत केले. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या उपक्रमांचे प्रमुख उद्घाटक म्हणून ते बोलत
होते.
करिअर निवडताना असणाऱ्या अनेक पर्यायांमधून अचूक निर्णय कसा निवडावा, अभ्यासाच्या ताणाचे व्यवस्थापन करताना कोणत्या बाबीचा विचार करावा, विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उकल होण्यासाठी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतून करिअरमधील फरक समजून घेताना कला, वाणिज्य, विज्ञान, शाखेतील संधीचा उलगडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे पालक-विद्यार्थ्यांना झाला. करिअर कोणत्याही एका विषयावर किवा परीक्षेवर अवलंबून नसून जीवनात अनेक संधी मिळत असतात. त्यातून योग्य तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते, त्या संधीचे सोने करण्यासाठी परिश्रमांची किंमत मोजावी लागते. एका अपयशाने सर्व काही संपले असे समजण्याचे कारण नाही, असे नाडकर्णी म्हणाले. मिळालेल्या माहितीचे मर्म विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवा. वैध मार्गाने पैसे कमवणे सोपे असते, त्याचा विनियोग करताना मी आणि आपण हे समजले नाही तर आपण मागे राहू, असे नाडकर्णी म्हणाले. समूहामध्ये काम करत असताना आत्मविश्वास हवा, त्याचबरोबर दुसऱ्याला समजूनही घेता यायला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीने प्रेझेंट केलेल्या व विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्ड बाय म्हणून आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ, दिलकॅप महाविद्यालय, रोबोमेट, एलटीए आणि सस्मिरा तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या वाटा उपलब्ध असून अभियांत्रिकीतील पदविका, पदवी यापलीकडेही अनेक संधी असून विद्यार्थ्यांनी आपले लक्ष तेथे केंद्रित केले पाहिजे. ज्यामध्ये करिअर करायचे आहे, त्याची निवड अ‍ॅडमिशन घेण्यापूर्वीच ठरवावे. वेबसाइटवर सर्वच महाविद्यालयांबद्दल खरी माहिती नसते, पण स्वत: महाविद्यालयामध्ये जाऊन माहिती घेत फॉर्म भरावा, तसेच मोबाइल माध्यमांच्या मोहातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.
– विवेक वेलणकर, समुपदेशक

वैद्यकीय क्षेत्राकडे वाटचाल करण्यासाठी नीटची परीक्षा द्यायची असेल तर अकरावी व बारावीमध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करावा, तर क्लासमध्ये प्रवेश घेत असताना क्लासची माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा. क्लासेसच्या प्रसिद्धीला बळी पडू नये. नीटच्या पेपरची परीक्षा देत असताना सुरुवातीला बायोलॉजी, केमिस्ट्री नंतर फिजिक्सचा पेपर सोडवण्यासाठी वेळ द्यावा, असे मार्गदर्शन केले.
– नागेश सावंत, प्राध्यापक

ललित कला क्षेत्रामध्ये कोणत्याही शाखेतून प्रवेश करता येतो. ललित कला क्षेत्रातदेखील आव्हाने असून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्वत:ची क्षमता ओळखणे आवश्यक आहे. ललित कला क्षेत्रात विविध शिष्यवृत्ती मिळते. या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांमध्ये नोकरीच नव्हे तर व्यवसायाच्याही संधी उपलब्ध आहे.
– जयवंत कुलकर्णी, समुपदेशक

करिअर करताना समाजाची गरज व आपली आवड हे यशाचे गमक आहे. स्वत:चा मार्ग निवडताना तो स्वत: निवडला पाहिजे आणि आपल्याला जे आवडते त्यामध्येच करिअर केले पाहिजे.
– दीपाली दिवेकर, समुपदेशक

ज्याला व्यवहारी गणित पसंत आहे आणि ज्यांची अंक गणिताची दोस्ती आहे, त्यांनी वाणिज्य शाखा निवडली पाहिजे. सीए, सीएस, एफए, सीएमए, एएस या सगळ्या वाटा वाणिज्य शाखेतील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत.
– अमित अन्सारी, समुपदेशक

आजही मार्गदर्शन
वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात शनिवारीही कार्यशाळा होणार आहे. यात विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच पुढील वर्षी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबत माहिती दिली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2016 2:28 am

Web Title: loksatta marg yashacha 14
Next Stories
1 लेकुरवाळ्या महिला भिकाऱ्यांचा त्रास
2 कार्यशाळेत आज ‘नीट’ मार्गदर्शन..
3 पालिका अधिकाऱ्यांनी मालमत्ता जाहीर करावी- आयुक्त
Just Now!
X