आज वाशीत ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये गिरीश कुबेर यांचे व्याख्यान

अमेरिकेने इराणवर लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायाने भारतीयांच्या दैनंदिन खर्चावर काय परिणाम होईल, यासह इंधन दरांची गणिते, त्यावरील करआकारणी, इंधन निर्यातदारांची संघटना, त्या संघटनेची धोरणे असे इंधनाशी संबंधित विविध पैलू गुरुवारी वाशी येथे होणाऱ्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ या कार्यक्रमात उलगडण्यात येणार आहेत. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या संदर्भातील विविध प्रश्नांची उकल करतील. वाशीतील मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ‘एनकेजीएसबी बँक लि.’ प्रायोजक आहे.

इराण हा भारतासाठी महत्त्वाचा तेल निर्यातदार देश आहे. जागतिक महासत्ता अमेरिकेने नुकतेच इराणवर आर्थिक र्निबध लादले आहेत. इराणकडून होणारी तेल आयात ७ नोव्हेंबरच्या आत पूर्णपणे बंद करावी लागणार आहे. हे र्निबध झुगारून इराणकडून आयात सुरू ठेवणे भारताला शक्य आहे का, नसल्यास त्याचे परिणाम काय होतील, इराण वगळता अन्य कोणत्या देशाकडून खनिज तेल मिळवता येईल, कित्येक वर्षांपासूनचा जुना निर्यातदार सोडून अन्य एखाद्या देशाकडून तेल मिळवण्यातील तोटे काय, त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, असे अनेक प्रश्न अमेरिकेच्या या एका निर्णयामुळे निर्माण झाले आहेत. त्यांची उकल या कार्यक्रमात करण्यात येईल.

खनिज तेलाचे विविध इंधनांत रूपांतर कसे केले जाते, इंधनांच्या दरांत वाढ का होते, त्याचे जागतिक स्तरावर कसे पडसाद उमटतात, त्यामुळे राजकीय क्षेत्रात कोणत्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटतात, या साऱ्या अवाढव्य व्यवहारांचा आपल्या रोजच्या खर्चावर काय परिणाम होतो, खनिज तेलाचे मर्यादित साठे संपल्यानंतर पुढे काय, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या कार्यक्रमात केला जाईल.

इंधनाच्या मुद्दय़ावर आजवर देशात आणि जागतिक स्तरावर राजकारण कसे तापले, तापवले गेले हे या कार्यक्रमात जाणून घेता येईल. प्रश्न विचारण्याची संधीही दिली जाणार आहे. कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

कुठे?

मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर- ६, वाशी, नवी मुंबई.

कधी?

* आज, गुरुवार, ९ ऑगस्ट,

* संध्याकाळी ६ वाजता.