मोरबे धरणात ४९.३७ टक्के जलसाठा

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई शहरात काही दिवसांपासून पावसाचा चांगला जोर आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात कमी पाऊस झाला आहे. मोरबे धरणात जवळजवळ ४९.३७ टक्के जलसाठा झाला असून धरण भरण्यासाठी  अजूनही जवळजवळ २ हजार ४०० मिलिमीटर पावसाची गरज आहे.

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात गेल्यावर्षी ५२५१.२० मिलीमीटर  एवढय़ा विक्रमी पावसाची नोंद  झाली होती. त्यामुळे धरणात मुबलक साठा झाला होता. गतवर्षी मोरबे धरणही भरले होते. मोरबे धरणात अद्याप पुढील ६ महिने पुरेल एवढा जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण मागील सलग तीन वर्ष  भरले होते. दुसरीकडे मोरबे धरण परिसरात मागील ९८ वर्षांनंतर प्रथमच  गेल्यावर्षी जवळजवळ ५०००मिमी.पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती.त्यामुळे जुलै संपत आला  तरी धरणात पुढील ६ महिने पुरेल एवढा जलसाठा शिल्लक असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

गतवर्षी जून महिन्यात पावसाला सुरवात झाली तेव्हा धरणात फक्त ४० टक्के जलसाठा म्हणजेच ६८.१६३ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात शिल्लक होते.  धरणात मंगळवापर्यंत ९४.२४३ दशलक्ष घनमीटर जलसाठा  शिल्लक आहे. त्यामुळे ५ जानेवारी २०२१ पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा शहरात आहे.

काही दिवसापासून शहर आणि मोरबे धरण परिसरात पाऊस पडत आहे. परंतू धरण परिसरापेक्षा नवी मुंबई शहरात पावसाचा जोर अधिक आहे.  धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ एवढी असून धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते. गेल्यवर्षी मोरबे धरणाची पाटबंधारे विभागाने पाहणी करुन धरणाच्या मजबुतीबाबत कौतुक केले होते.स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई महापालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे.त्यामुळे नवी मुंबई शहराला जलसंपन्न शहर संबोधले जाते.

आजवर पाणी

आजची धरण पातळी : ७६.६५ मीटर

एकूण पाऊस : १३८५.९६ मिमी

धरण परिसरातील एकूण पाऊस : ११०१.८० मिमी.


धरणात ४ जानेवारी २०२१ पर्यंत पुरेल इतका जलसाठा
मोरबे धरणात मुबलक साठा असून अद्याप पावसाळ्याचे दिवस बाकी असून यावर्षीही धरण भरेल अशी आशा आहे.

 -अभिजीत बांगर, आयुक्त नवी मुंबई पालिका