|| संतोष जाधव

आरोग्य विभागात ४८ डॉक्टरांची लवकरच नियुक्ती : – नवी मुंबई महापालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. लवकरच ४८ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.

शहरात नेरुळ, बेलापूर, ऐरोली येथे जनसामान्यांच्या कररूपाने मिळालेल्या पैशातून कोटय़वधी रुपये खर्चून प्रशस्त अशी सार्वजनिक रुग्णालयांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत; परंतु ज्या माताबाल रुग्णालयांच्या जागेवर सार्वजनिक रुग्णालये उभारली तेथे अजूनही रडतखडत आरोग्य सेवा सुरू आहेत. नेरुळ, ऐरोली येथील माताबाल रुग्णालयात अनेक वेळा प्रसूती विभाग  बंद अवस्थेत असतो.

बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात पाच वर्षांनंतर सेवा सुरू झाली. आतापर्यंत फक्त बाह्य़रुग्ण विभागच सुरू होता. आयुक्त मिसाळ यांनी अभियंता विभाग व आरोग्य विभागाला धारेवर धरत येथील सेवा सुरू केली. महापालिकेने १४८ पदांसाठी  विविध संवर्गातील डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबवली असून ४८ डॉक्टरांची निवडही करण्यात आली; परंतु आचारसंहितेअभावी त्यांना नियुक्तिपत्रे देता आली नाहीत; परंतु आता आचारसंहिता संपल्यामुळे लवकरच महासभेच्या मान्यतेने ४८ डॉक्टरांना नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. या ४८ डॉक्टरांमध्ये गॅस्ट्रोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, क्ष-किरणतज्ज्ञ, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, प्लास्टिक सर्जन वॅस्कुलर सर्जन, बधिकरणतज्ज्ञ, बालरोगतज्ञ्ज, शल्यचिकित्सक, न्यायवैद्यकशास्त्रज्ञ अशा विविध प्रकारांतील डॉक्टरांची प्रत्यक्ष नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सक्षम होण्यास मदत होणार आहे.  नव्या इमारतींमधील अनेक मजले अद्याप वापराविना धूळ खात पडून आहेत. याबाबत आयुक्तांनीही ‘लोकसत्ता’शी बोलताना खंत व्यक्त केली असून सक्षम आरोग्य सेवा देण्याकडे अधिक लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्तांची रुग्णालयांना भेट

शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शुक्रवारी ऐरोली व वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयांना भेटी देत आरोग्य सेवेची माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत चांगली सेवा देण्याचे आदेश दिले.

महापालिकेत अतिशय देखण्या व टोलेजंग इमारती उभारल्या आहेत; परंतु आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ४८ डॉक्टरांची निवड करण्यात आली आहे. महासभेच्या मान्यतेने तात्काळ या नेमणुका करण्यात येतील. – अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका