महापे

महापे. शिळफाटा मार्गावर लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीच्या जवळ अनेक कारखान्यांच्या गराडय़ात हरवलेले एक स्वयंपूर्ण गाव. कोपरखैरणे रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर तर ठाणे बेलापूर मार्गापासून अध्र्या किलोमीटरवरचे हे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले एक सुंदर खेडे. चारही बाजूने घनदाट जंगल. गावात सूर्याची किरणे सहज पोहोचत नव्हती इतकी जंगलसंपदा लाभलेली होती.

Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

महापे. शिळफाटा मार्गावर लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीच्या जवळ अनेक कारखान्यांच्या गराडय़ात हरवलेले एक स्वयंपूर्ण गाव. कोपरखैरणे रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर तर ठाणे बेलापूर मार्गापासून अध्र्या किलोमीटरवरचे हे निर्सगाच्या सान्निध्यात वसलेले एक सुंदर खेडे. चारही बाजूने घनदाट जंगल. गावात सूर्याची किरणे सहज पोहोचत नव्हती इतकी जंगलसंपदा. या घनदाट जंगलात सागवानाची हजारो झाडे. आंबे, जांभूळ, वड, पिंपळ यांची तर गणतीच नाही. आकोला नावाचे एक झाड तर आता कुठेच बघायलादेखील मिळत नाही. ही वनसंपदा जपण्यासाठी ब्रिटिश काळापासून या गावाच्या वेशीवर एक वनविभागाची चौकी सुरू करण्यात आली होती. ती आजही कायम आहे. वनविभागाच्या या चौकीवर त्या वेळी तोडलेल्या वृक्षांचा मोठा डेपो लागत होता. तेथे तोडलेली झाडे मोजण्यासाठी गावातील काही मंडळींना बोलावले जात होते. त्याला मापाला (मोजायला) जात असल्याचे म्हटले जायचे. मापावरून महापे असा अपभ्रंश होऊन या गावाचे नाव नंतर महापे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. चारही बाजूने किर्रर रान असलेल्या या गावात पहिल्या प्रथम आलेल्या आठ-नऊ कुटुंबांच्या विस्तारातूनच या गावाची निर्मिती झाली असावी असे म्हटले जाते. आज जंगलाची जागा कारखाने व आयटी कंपन्यांनी घेतली आहे.

जेमतेम साडेसहा एकरवर ह्य़ा गावाचे अस्तित्व होते, मात्र आजूबाजूला असलेली चार गावांची साडेचारशे एकर जमीन हे या गावाचे वैभव होते. त्याच जमिनीवर आज आशिया खंडातील सर्वात मोठय़ा औद्योगिक वसाहतीचा काही भाग विस्तारलेला आहे. पूर्वे बाजूस अडिवली भुतवली गावाची सीमा तर पश्चिम बाजूस ठाणे बेलापूर मार्गाची कच्ची पायवाट. आत्ताच्या जसानी कंपनीपर्यंत या गावाची दक्षिण बाजूस हद्द होती तर उत्तर बाजूस हर्डिलिया कंपनीपर्यंत या गावाचा विस्तार झाला होता. चारही बाजूने जंगल आणि त्याच्या मधोमध गाव असे चित्र असलेल्या या जंगलाच्या परिसरातच पसरलेल्या शेतीत भात पीक घेणे आणि गुरचरण क्षेत्रात असलेले मुबलक असलेले गवत घेऊन ठाण्याला विकणे हे दोनच या गावातील ग्रामस्थांचे पारंपरिक व्यवसाय होते. त्यासाठी प्रत्येक घरामागे एक बैलगाडी होती. शिवनारायण पाटील यांच्या तर दोन बैलगाडय़ा होत्या. याच गाडय़ांमधून ठाण्याला गवत, पेंढा विकण्यास नेला जात होता. त्यानंतर त्याच बैलगाडय़ामधून महिन्याचा बाजारहाट आणला जात होता. वनविभागाने तोडलेल्या लाकडांची ने-आण करण्यासाठी ह्य़ा बैलगाडय़ा  वापरल्या जात होत्या. डोंगरातील चढ-उतारावर बैलगाडीतून लाकडांची वाहतूक करणे एक कसब होते. या मेहनतीने ग्रामस्थांच्या हातात दोन पैसे पडत होते. सत्तरच्या दशकात एमआयडीसीने आजूबाजूची जमीन ६२ पैसे मीटरने संपादित केली आणि एमआयडीसीतील कारखान्यांचा आवाज गावात घुमू लागला.

स्टॅण्र्डर्ड अल्कली, कॅफे, किसान फर्टिलायझर, जसानी, युनिक केमिकल्स असे कारखाने गावाच्या आसपास सुरू झाल्याने ग्रामस्थांनी नोकऱ्या पत्करल्या. गावाची प्रगती होऊ लागली पण हळूहळू शेती नेस्तनाबूत झाली. सरकारच्या जागेत आता मिलेनियम बिझनेस पार्क झाले आहे. ती जागा गुरचरण होती. आता नागरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे गाव कुठे आहे हे शोधण्याची वेळ आली आहे. इतक्या प्रमाणात झाडेझुडपे असल्याने हिंस्र प्राण्यांचाही वावर या भागात मोठय़ा प्रमाणात होता. गावाच्या वेशीवर आणि गावात वाघ पाहिल्याचेही काही ग्रामस्थ आजही सांगतात. पूर्वे बाजूस आजही अस्तित्वात असलेल्या धाबेश्वर मंदिरात हा वाघ येत असे. त्यामुळेच या मंदिराला नंतर वाघोबा मंदिरही म्हटले जाते. गावातील मरीआई ही या वाघेश्वर मंदिराची बहीण मानली गेल्याने हा वाघ या मंदिरातही येत असल्याचा ग्रामस्थांचा विश्वास आहे. मुबलक शेती असल्याने सामूहिक शेतीचे प्रयोग त्या वेळी राबविले गेले आहेत. पेरणी आणि मळणीच्या वेळी संपूर्ण गाव त्या धाबेश्वर मंदिरात वर्षांचा राखण देत असे. आगरी भाषेत त्याला साथ म्हणतात. ही साथ देण्यासाठी गावातील ग्रामस्थांचे दोन गट पडत होते. खापरीत (मातीच्या मडक्यात) शिजवलेला भात घेऊन तो रस्त्याने टाकत टाकत सीमा गाठली जात होती. त्यासाठी उजवे आणि डाव्या भागात विभागलेले ग्रामस्थ ही साथ देण्यासाठी अडवली भुतवली गावापर्यंत असलेल्या वेशीवर जात होते. वर्षांतून दोन वेळा पेरणी व मळणीला हा उत्सव होत होता.

आता जंगलही गेले आणि शेतीही गेली. त्यामुळे हा नवस चैत्र वर्षांत गावातील देवीला फेडला जातो. त्यालाच गावची जत्रा म्हणण्याची प्रथा अलीकडे पडली आहे. गावात आगरी समाजाचेच शंभर टक्के अस्तित्व मानले जाते. पाटील, डाऊरकर, साष्टे, घरत आणि एक भोईर कुटुंबांचा विस्तार होऊन ७०-८० लोकसंख्येचे गाव आता हजाराच्या घरात गेले आहे. यात काही कुटुंबे गावातील भांडणतंटा, प्लेगसारख्या आजारांची साथ यामुळे आजूबाजूच्या गावातून स्थलांतरित झालेले आहेत. यात डोंगराच्या पल्याड असलेल्या उत्तरशिव गावातून पाटील तर ठाण्याच्या सोनारपाडाजवळील डावरी गावातून डाऊरकर कुटुंब या गावाचा अविभाज्य घटक होऊन गेली आहेत. शिक्षणाबाबत इतर गावांसारखीच या गावाची स्थिती आहे.

पहिल्यांदा तिसरीपर्यंत असलेल्या शाळेत प्राथामिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोपरखैरणे व घणसोली येथील माध्यमिक शाळांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यातही देशमुख बंधूंनी व नवनाथ पाटील यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गावात मरीआई मंदिराबरोबरच अलीकडे हनुमान व गणपतीच्या मंदिरांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. मात्र जुनी मंदिरे म्हणून वाघोबा व मरीआई आणि एक आता हनुमान झोपडपट्टी वसाहत असलेल्या ठिकाणी असलेले हनुमान मंदिर आहे. विश्वनाथ डाऊरकर सारख्या तरुण ग्रामस्थांनी ग्रामविकास मंडळाची स्थापना करून गावातील एकता कायम कशी राहील याकडे लक्ष दिले. बाळू शिवराम पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य होऊन राजकीय श्रीगणेशा केला आहे. सत्यनारायणाच्या निमित्ताने जमा होणारी वर्गणी शिल्लक राहिल्यास गावात अडीअडचणीत सापडलेल्या ग्रामस्थाला मदतीसाठी वापरली जात होती. बचत गटाचाच हा एक प्रकार होता, पण त्यात गावकऱ्यांना मदत करण्याची भावना जास्त होती.

गावाच्या शेजारी वनसंपदा मोठय़ा प्रमाणात असल्याने होळीचा कार्यक्रमही दणक्यात होत होता. जंगलातील सुकी लाकडे आणून होळी पेटवण्याचा समारंभ तब्बल एक आठवडा चालत होता. त्याला हाऊल कसरा म्हणतात. त्या वेळी एक गाव एक होळी असलेली परंपरा आजही कायम ठेवण्यात आली आहे. गावाला तसा इतिहासकालीन स्पर्श आहे. सध्या दक्षिण बाजूस असलेल्या विप्रो इंडिया या छपाई कंपनीच्या आतील बाजूस एक बुरुज आहे. समुद्रात चालणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी  पेशवे काळात हा टेहळणी बुरुज उभारण्यात आल्याची नोंद आहे. असे कोपरखैरणे गावापर्यंत चार-पाच टेहळणी बुरुज या परिसरात होते, असे जुने ग्रामस्थ सांगतात. राज्याच्या प्रगतीसाठी आपली जमीन स्वखुषीने देणाऱ्या या गावाला आता उद्योगधंद्याने कुशीत घेतले आहे, पण ग्रामस्थ जुन्या रूढी-परंपरा कायम ठेवून आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.