मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

परदेशातील अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची महाराष्ट्राला पसंती असून या ठिकाणी असलेली तरुणाई हे यामागील कारण आहे. राज्यातील तरुणांचे सरासरी वयोमान सत्तावीस वर्षे आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योगाला आवश्यक असलेले हे मनुष्यबळ राज्यात मोठय़ा प्रमाणात असल्याने राज्य आयटी क्षेत्रात आघाडीवरच राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली येथील कॅपेजेमिनी नॉलेज पार्क या आयटी उद्योगाच्या राज्यातील शुभारंभ प्रसंगी दिली.

ऐरोली येथील जुना पटनी कॉप्युटर आयटी उद्योग आता जर्मनीतील कॅपजेमिनी नॉलेज पार्क उद्योगसमूहाने हस्तांतरिीत करून घेतला आहे. त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे, आमदार संदीप नाईक, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, पोलीस आयुक्त प्रभात रंजन, पालिका आयुक्त दिनेश वाघमारे उपस्थित होते. राज्यात सुशिक्षितांची फार मोठी फौज असून आयटी क्षेत्रात क्रांती करण्याची ताकद या तरुणाईमध्ये आहे. परदेशातील बडय़ा कारखान्यांना महाराष्ट्राचे आर्कषण असल्याचे मेक इन इंडियाच्या निमित्ताने अधिक अधोरिखित झाले आहे. त्यामुळे येत्या काळात युरोपमधील अनेक कारखाने राज्यात सुरू होणार असून रोजगार मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे येत्या काळात राज्य उद्योगधंद्यात अव्वल राहणार असून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. ऐरोली येथील पटनी ही आयटी क्षेत्रातील या भागातील पहिली कंपनी सुरू असल्याने या मार्गाला तसेच येथील भव्य मैदानाला पटनी मैदान नावानेच ओळखले जाते, पण त्यानंतर आय गेट या कंपनीने ही कंपनी हस्तांतरित करून घेतली. आता कॅपजेमिनी नॉलेज पार्क ही आयटी कंपनी पटनीची धुरा सांभाळणार असून त्यांनी यावेळी दुसऱ्या टप्प्यातील उद्योगाचा शुभारंभदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला.