19 December 2018

News Flash

शहरबात- पनवेल : ‘सुनियोजित’ शहराची कोंडी

सिडकोने वसाहती जोडणारे स्वतंत्र सेवारस्ते अद्याप बांधलेले नाहीत

प्रतिनिधिक छायाचित्र

दोन आठवडय़ांपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकांचे वाहन नवी मुंबईतील वाहतूक कोंडीत काही मिनिटे अडकले. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागातील सहा पोलिसांच्या बदल्या करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामुळे प्रश्न सुटलेला नाही. महासंचालकांनी अवघ्या काही मिनिटांसाठी अनुभवलेली कोंडी नवी मुंबईकर रोज सहन करत आहेत. ‘सुनियोजित’ हे बिरुद मिरवणाऱ्या नवी मुंबईत कोंडी नित्याचीच आहे. सिडकोने वसाहती जोडणारे स्वतंत्र सेवारस्ते अद्याप बांधलेले नाहीत. विकास आराखडय़ाकडे दुर्लक्ष केल्यास ही कोंडी वाढतच जाण्याची शक्यता आहे.

‘नवी मुंबई हे सर्वाधिक वाहनमालकांचे शहर आहे,’ असे विधान राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नवी मुंबई पोलीस दलाच्या सोहळ्यात सात वर्षांपूर्वी केले होते. वाशी खाडीपुलापासून सुरू झालेली नवी मुंबई ठाणे जिल्ह्य़ातील ऐरोलीपर्यंत, पनवेल तालुक्याच्या वेशीपर्यंत आणि थेट यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गापर्यंत पसरली आहे. पनवेलमधील ९० गावे व उरण तालुका या नवी मुंबईचाच भाग आहे. २३ वर्षांपूर्वी नवी मुंबईचे वाढते शहरीकरणाकडे पाहून गृहविभागाने पूर्वीचे ठाणे आयुक्तालय वगळून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू केले. १९९४ साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली. हेमंत नगराळे हे पोलीस आयुक्त आहेत. वाहतूक पोलीस शहरातील रस्त्यांवर वाहतूक नियमन करताना दिसणे अपेक्षित आहे, मात्र तसे अनेकदा होत नसल्याबद्दल महासंचालकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सध्यातरी पोलीस आळीपाळीने वाहनांमधील व्यक्तीला दिसतील असेच, आडोशाला उभे राहिलेले दिसतात. मात्र आयुक्तांनी सहा पोलिसांची बदली केल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मिटणार नाही.

ज्या मार्गावर सिग्नल आहेत, तेथेही मोठी वाहतूक कोंडी होते. वाहनांची संख्या वाढली, तरी रस्त्यांची रुंदी तेवढीच राहिली आहे, त्यामुळे इतर पर्याय निर्माण करण्यापेक्षा पोलीस नेमावा लागत आहे. परदेशातील वाहतूक अभियांत्रिकी शास्त्र येथे मानण्यास सरकार तयार नाही. अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने जोड देण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे अपघातप्रवण क्षेत्रे निर्माण झाली आहेत. प्रत्येक सिग्नलवर पोलिसांची जोडी नेमावी लागेल, असाच सध्याचा वाहतूक विभागाचा कारभार आहे.

मुंब्रा-पनवेल मार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. अंबरनाथ, भिवंडी औद्योगिक वसाहतीमधून थेट जेएनपीटी बंदरात येणारा माल याच कारणामुळे तळोजा ते कळंबोली मार्गावर कोंडीत अडकलेला दिसतो. एखाद्या रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर ते युद्धपातळीवर संपवण्यात आल्याचे दिसत नाही. तशी व्यवस्थाच निर्माण करण्यात आलेली नाही. महामार्गाचे काम करण्यापूर्वी वाहतुकीचा पर्यायी मार्ग निश्चित केला जात नाही, केल्यास त्यासंदर्भात जनजागृती केली जात नाही.

तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ रोज रस्ता ओलांडणाऱ्यांची गर्दी झालेली दिसते. ही गर्दी रस्ता रुंदीकरणानंतरही कमी झालेली नाही. टीटीसी एमआयडीसीमध्ये शिरताना सिग्नलजवळ होणारी वाहतूक कोंडी नवी मुंबईकरांना नित्याची आहे. बेलापूरमध्ये कोकणभवनाशेजारील कोंडी नेहमीचीच आहे. कोंडी सोडविण्यासाठी पोलीस असावा की वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी रस्ते असावेत, याचा विचार करण्याची तसदी सरकारच्या विविध विभागांतील तज्ज्ञ अभियंत्यांनी घेतलेली नाही.

नवी मुंबईतील अरुंद रस्त्यांवर सकाळी कार्यालयात जाणाऱ्या वाहनांची स्पर्धाच सुरू असते. जेएनपीटी बंदरामध्ये दररोज सुमारे १३ हजार अवजड वाहने ये-जा करतात. टीटीसी-महापे, तुर्भे, तळोजा ही औद्योगिक क्षेत्रे आहेत. वाशी, नेरुळ, ऐरोली यांसारख्या १८ वसाहती आणि दोन महापालिका क्षेत्रे याच महामुंबई परिसरात येतात. उरण, पनवेल व नवी मुंबईतील अवजड, चारचाकी, दुचाकी वाहने दिवसभर रस्त्यांवर ये-जा करतात. विविध सरकारी प्राधिकरणांनी एकत्रित आराखडा तयार न केल्यास नवी मुंबई आणि परिसरातील प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांग लागलेल्या दिसतील. पोलीस महासंचालकांनी बदलीच्या कारवाईची शिफारस करण्यापेक्षा मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न केल्यास, अधिक फायदा होईल.

पर्यायांची गरज

वाहनसंख्या पुढील पाच वर्षांत तिप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र पुढील पाच वर्षांत वसाहतींना जोडणारे सेवारस्ते, महामार्गाला  जोडणारा स्वतंत्र रस्ता, प्रत्येक वसाहतीच्या बायपाससाठी उड्डाणपूल, रुग्णवाहिका, पादचारी, दिव्यांग व्यक्ती व सायकलस्वार यांच्यासाठी वेगळा मार्ग नाही, सरकारी उपक्रमांच्या बसगाडय़ांसाठी मार्गिका इत्यादी सोयी झाल्या नाहीत, तर येथील वाहतुकीची स्थिती भयावह होण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या असलेल्या मनुष्यबळात २५० पोलीस शिपाई आणि ३५ पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता आहे. नवी मुंबईकरांची कोंडी हा प्रश्न पोलिसांच्या बदल्यांतून सुटणार नाही.

First Published on November 14, 2017 2:26 am

Web Title: maharashtra dgp stuck in navi mumbai traffic congestion
टॅग Maharashtra DGP