सेवा सुधारण्यासाठीचे पाऊल; पालिकेतील अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील सर्वात महत्त्वाचे असलेले वैद्यकीय आरोग्य अधिकारी पद अनेक वर्षांपासून प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांकडेच आहे. या पदासाठी आरोग्य विभागातील अनेक डॉक्टरांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा आहे, मात्र आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासनाकडूनच वैद्यकीय अधिकारी मागवणार असल्याचे संकेत आयुक्तांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहरात नेरुळ, बेलापूर, ऐरोली येथे कोटय़वधी रुपये खर्च करून देखणी व प्रशस्त सार्वजनिक रुग्णालये उभारली आहेत, मात्र ज्या माता-बाल रुग्णालयांच्या जागेवर ही रुग्णालये उभारली तिथे आजही माता-बाल रुग्णालयेच रडतखडत सुरू आहेत. डॉ. दीपक परोपकारी यांच्यानंतर या पदावर कोण विराजमान होणार याचे आडाखे सध्या बांधले जात आहेत.

पालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून रुग्णालयांच्या टोलेजंग वास्तू उभारल्या आहेत, मात्र त्यात आरोग्यसुविधांचा दुष्काळ आहे. बेलापूर येथे फक्त बाह्य़ रुग्ण सेवा तर नेरुळ व ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालयांऐवजी माता बाल रुग्णालय सुरू आहे. २००९मध्ये रुग्णालयांच्या इमारतींचे बांधकाम सुरू झाले, परंतु या इमारती संपूर्ण रु ग्णालयीन सेवेअभावी ओस पडल्या आहेत. वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात कमी खाटा असून  रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. जमिनीवर गाद्या टाकून उपचार घेण्याची वेळ रुग्णांवर व प्रशासनावर येत आहे.

तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांच्या पदोन्नतीनंतर या पदावर नेमलेले सर्व अधिकारी हे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी आहेत. त्यामुळे शहराला वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.

पालिकेतील डॉ. प्रशांत जवादे, डॉ. दयानंद कटके, डॉ. धन्वंतरी घाडगे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. रुग्णालये सुरू होण्यासाठी आवश्यक व अत्यावश्यक असलेली साधने व इतर सोयीसुविधा देण्याची तयारी महापालिकेने केली असताना दुसरीकडे तितक्याच क्षमतेने हा कारभार सांभाळण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक होण्याची आवश्यकता आहे. आरोग्या सेवेत अधिकाऱ्यांमधील वाद, कुरघोडीमुळे अडसर येत आहे. प्रत्येक महासभा व स्थायी समितीच्या सभेत आरोग्य विभागाचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. या विभागाची स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडूनच वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

शहरात दर्जेदार आरोग्य सेवा द्यायची आहे. रुग्णालयांसाठी इमारती तयार असताना उपकरणे, डॉक्टर आणि साहित्याअभावी अनेक अडचणी येत होत्या. आता मोठय़ा प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे कारभार सुधारून नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देणे आवश्यत आहे. त्यासाठी शासनाकडूनच वैद्यकीय आरोग्य अधिकारी मागवण्यात येणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एका महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी ५ एप्रिलला आरोग्य विभागाचे शासनाचे वरिष्ठ अधिकारी नवी मुंबईत येणार आहेत. त्यांना पालिकेची रुग्णालये दाखवण्यात येणार असून लवकरच वैद्यकीय आरोग्य अधिकारीही नेमण्यासाठी  प्रयत्नशील आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका