महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून त्यात नवी मुंबईचा निकाल ९३.७४ टक्के लागला. नवी मुंबईतून एकूण १४ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यांपैकी १३ हजार ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १४७ शाळांपैकी ३६ ते ३८ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. यामध्ये  ऐरोली, घणसोली, नेरुळ, वाशीतील शाळांचा समावेश आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या १७ माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल ८९ टक्के लागला. नेरुळ येथील पालिका शाळेतील विद्यार्थी वैष्णव कोंडाळकर ९४.६० टक्के गुण मिळवून पालिका शाळांत प्रथम आला. २००६-०७ पासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतून विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा देत आहेत. प्रत्येक वर्षी निकालाचा आलेख उंचावत आहे. या वर्षीही महानगरपालिकेच्या १७ शाळांमधून २१,१७६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते.

अपंग प्रशिक्षण केंद्राचा निकाल १०० टक्के

महानगरपालिकेच्या अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा (ईटीसी) निकाल या वर्षीही १०० टक्के लागला. सलाह मुकादम या कर्णबधिर विद्यार्थ्यांने ८० टक्के गुण मिळवले. प्रदीप चौधरीने ७४ तर सूर्या पणीकरने ७९ टक्के गुण मिळवले. अक्षम अपंग प्रवर्गातील केतन शर्माने ८५ टक्के, तर जिशान जेसानीने ७४ टक्के गुण मिळवले.