तळोजातील कारखान्यांतून फर्मल्डिहाइड वायू सोडला जात नसल्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा

तळोजा येथील कोणत्याही कारखान्यांतून फॉर्मल्डिहाइड हा वायू निघत नसल्याचा दावा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केला आहे. खारघर परिसरातील जंगले किंवा गवत जाळल्यामुळे हा वायू निर्माण झाला असण्याची शक्यता एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. खारघर परिसरात या वायूचे प्रमाण सामान्य पातळीच्या अडीचपट असल्याचे आणि त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण खारघरमधील रहिवाशांच्या पुढाकारातून ‘इक्विनॉक्स लॅब’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले होते. त्या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता महामुंबई’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाले होते.

फॉर्मल्डिहाइड या वायूमुळे कर्करोग होतो, असे निदान अद्याप झाले नसल्याचा दावा एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. हा वायू कोठून आला याबद्दल विचारणा केल्यावर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी खारघर जवळची जंगले व गवत यांच्या ज्वलनातून या वायूची निर्मिती होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

खारघर येथील रहिवाशांनी ‘इक्विनॉक्स लॅब’च्या साहाय्याने १७ दिवसांपूर्वी वसाहतीमधील सेक्टर ३५ मधील ‘१०२ आरएएफ’च्या प्रवेशद्वारावर रात्री हवेचे नमुने तपासले असता, त्यात फॉर्मल्डिहाइड सामान्य पातळीच्या अडीचपट अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वायू जैविक कचरा विघटनादरम्यान, सौंदर्य प्रसाधने, प्लायवूड, प्लास्टिक बोर्ड बनविणाऱ्या, लॅमिनेशन करणाऱ्या कारखान्यांत वापरण्यात येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एमपीसीबीने यावर अद्याप थेट स्पष्टीकरण दिले नसले, तरी एमपीसीबीच्या पनवेल विभागाचे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी खारघरवासीयांना भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे, सांगितले आहे. सध्या मोहेकर आजारी असल्यामुळे त्यांनी याविषयी सविस्तर बोलणे टाळले.

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जैविक कचरा विघटनासाठी एक प्रकल्प आहे. त्यात ‘फॉर्मल्डिहाइड’ हे रासायनिक द्रव्य वापरण्यात येत असल्याचा दावा खारघरचे रहिवासी मंगेश रानवडे यांनी केला आहे. पनवेल पालिकेने ठिकठिकाणी प्रदूषणमापक यंत्रे बसवावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली होती, मात्र हवेतील दूषित वायूचे प्रमाण ओळखणे हा पर्याय नसून प्रदूषणावर नियंत्रण मिळवावे लागेल, असे पालिकेने स्पष्ट केले होते. खारघर वसाहत औद्योगिक वसाहतीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. परंतु तळोजातील प्रदूषणाचे दुष्परिणाम सर्वप्रथम औद्योगिक वसाहतीच्या मध्यभागी असणाऱ्या गावांवर होतात. गेल्या आठवडय़ात तापमानात घट झाल्यानंतर तळोजा, खारघर, पनवेल येथील डोंगराळ भागांत मोठा वणवा पेटला होता. त्यामुळे डोंगरांवरील सुकलेल्या गवताला आग लागली होती.

खारघरमधील रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले होते आणि ती आग विझवण्यात आली होती, मात्र नितळस, वळवली, मोरबे या डोंगरांवरील आगीचा वणवा विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा सरसावली नाही. ग्रामस्थांनी दर वर्षीच वणवे लागतात, असा विचार करत डोंगरांवरील आगीकडेही दुर्लक्ष केले. १७ दिवसांपूर्वी ‘इक्विनॉक्स लॅब’ने केलेल्या चाचणीत आढळलेला ‘फॉर्मल्डिहाइड’ हा वायू या वणव्यांतूनच निघाल्याची शक्यता एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.