निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेची पुढील महिन्यात होऊ घातलेली निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी केलेली ‘पेरणी’ पाण्यात गेल्याची चर्चा आहे. आता पुन्हा निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा त्यांना करावी लागणार आहे.

वाशीतील एका नगरसेवकाने तर मतदारांना खूश करण्यासाठी एक कोटी तीन लाख रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. अशाच प्रकारे प्रमुख पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी सरासरी दहा लाख तर अगदीच किरकोळ उमेदवाराचे लाखभर रुपये पणाला लागले होते. त्यामुळे मागील दोन महिन्यात झालेली कोटय़वधीची उलाढाल तूर्त पाण्यात गेली असल्याची चर्चा आहे.

राज्यात पसरणाऱ्या करोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असून निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील १११ प्रभागातील सुमारे एक हजार इच्छुक उमेदवारांची चिंता वाढली आहे. नवी मुंबईतील निवडणुकीचा ज्वर जानेवारी महिन्यापासूनच सुरू झाला होता. राज्यात झालेला ‘मविआ’चा प्रयोग नवी मुंबईत भाजपची सत्ता रोखण्यासाठी ‘मविआ’च्या सर्व स्थानिक व राज्य पातळीवरील नेत्यांनी तयारी केली होती. या नेत्यांनी वाशीत येऊन ‘मविआ’ची घोषणा केल्याने त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपनेही कंबर कसली होती. मविआ विरुद्ध भाजप असा एप्रिल महिन्यात सामना रंगणार असे स्पष्ट झालेले असतानाच करोनाचा देशात शिरकाव झाला. दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकार चिंताग्रस्त झाले असून नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलेल्या आहेत. हा काळ तीन ते सहा महिन्यांचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या सभागृहाची येत्या काळात मुदत संपणार त्या ठिकाणी प्रशासक नेमून कारभार केला जाणार आहे.

एप्रिलमध्ये निवडणुका होतील या हिशेबाने नवी मुंबईतील प्रमुख चार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी हळदी कूंकूच्या निमित्ताने धडाकेबाज कार्यक्रमांचा बार उडवून दिला होता. होम मिनिस्टरफेम अभिनेते आदेश बांदेकर यांचे ‘मविआ’च्या वजनदार इच्छुक उमेदवारांनी शहरभर कार्यक्रम आयोजित केले होते. बांदेकर यांच्या एका कार्यक्रमाची बिदागी ही काही लाखाच्या घरात आहे. पैठणी, नथणी, स्कूटी, प्रेशर कूकर, गॅस, लायटर, भांडी वाटप आणि सहली, ओल्या पाटर्य़ा यांचा अक्षरश: ऊत आला होता. त्यामुळे उमेदवारांची ही पेरणी सध्या पाण्यात गेली आहे.

व्यूहरचनेसाठी अवधी

एप्रिल महिन्यात निवडणुका होणार या उद्देशाने अनेक पक्षात आयाराम गयारामांचे प्रयोग पार पडले आहेत. ज्यांची अपेक्षा नव्हती त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात उमेदवार तयार करण्यासाठी करोनामुळे वेळ मिळाला आहे. पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांसमोर आता तगडे आव्हान उभे राहणार आहे.

‘एमआयडीसी’तील व्यवहारही ठप्प

जागतिक आर्थिक मंदीतून उद्योग व व्यवसाय सावरत असताना आता करोनामुळे आखाती देशातील आयात-निर्यात बंद झाल्याने मोठा फटका बसू लागला आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील व्यवहारही ठप्प झाले असल्याचे ठाणे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष के.आर.  गोपी यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त १०० टक्के आयात-निर्यात बंद झाली आहे.

प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश बंद

पनवेल : करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी पनवेल पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला आहे. मंगळवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत प्रार्थनास्थळांमध्ये भाविकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधित ठिकाणी भेटी देऊन तसे आवाहन करण्यात आले.

कांदा बटाटा बाजार दुपारी चारनंतर बंद

नवी मुंबई : एपीएमसी बाजार समितीने स्वच्छतेसाठी ३१ मार्चपर्यंत टप्याटप्याने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी भाजीपाला व फळबाजार दर गुरुवारी आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता कांदा बटाटा बाजार बुधवारपासून (१८ मार्च) दुपारी चार वाजता बंद करण्यात येणार आहे.

विरंगुळा केंद्र बंद

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात करोनाचा प्रसार  रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील सुमारे २१3 उद्याने व ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्राना मंगळवारी कूलूप लावले. नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.