News Flash

महावितरणचे २५ कोटी पाण्यात

एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता असून उरणकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

सडलेले खांब, तारा तुटू लागल्याने उरणवासीयांचा जीव टांगणीला

महावितरण कंपनीने शहरातील वीज वाहून नेणारे लोखंडी खांब, विद्युत तारा  बदलण्यासाठी इन्फ्रा- २ योजनेअंतर्गत केलेला २५ कोटींचा निधी वाया गेला असून उरण शहरात विद्युत खांब तसेच तारा तुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता असून उरणकरांचा जीव टांगणीला लागला आहे.

उरण शहराच्या मध्यवर्ती भागातील विमला तलाव येथील सडलेला खांब दोन दिवसांपूर्वी पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच पावसाळा सुरुवात झाल्याने हा धोका अधिक वाढल्याने महावितरण कंपनीकडून यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. मागील वर्षी उरण पंचायत समितीसमोरील उच्च दाबाची विद्युत तार तुटून एका प्रवासी बसवर पडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत अनेक वेळा महावितरण कंपनीकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत, मात्र त्यात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. उलट महावितरणचे अधिकारी मात्र वीज पुरवठय़ात सुधारणा झाल्याचा दावा करत आहेत.

वीज ग्राहक मेटाकुटीला

विजेची देयके तसेच त्यावर कर वारंवार वाढत असून वीज देयकांच्या तक्रारी ऐकून न घेता प्रथम आपल्या देयकाच्या रकमा जमा करा. अशा प्रकारची वागणूक ग्राहकांना दिली जाते. रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्यानंतर कार्यालयाशी संपर्क साधल्यास अधिकारी आणि कर्मचारीही दूरध्वनी उचलत नसल्याचे अनुभव अनेकांना आहेत, तर घरातील वीज खंडित झाली, तर ऑनलाइन तक्रार नोंदवा त्यानंतर काम करू, अशी उत्तरे मिळतात. अशा सर्व घटनांमुळे वीज ग्राहक अधिक मेटाकुटीला आला आहे.

५५ कोटींचा निधी गेला कुठे ?

उरण तालुक्यातील महावितरण कंपनीकडून सडलेले खांब, विद्युत तारा तसेच ट्रान्सफार्मर व भूमिगत केबल टाकण्यासह इतर साहित्य बदलण्यासाठी इन्फ्रा- १ मध्ये ३० कोटी रुपये तर इन्फ्रा- २ योजनेत २५ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण शहरातील विजेचे खांब आणि विद्युत तारा या सडलेल्या आणि निकृष्ट असल्याने हा निधी खर्च कुठे झाला, असा सवाल उरणकर विचारू लागले आहेत.

उरणमधील सडलेल्या तारा, विजेचे खांब तसेच ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासाठी दोन वर्षांपूर्वी इन्फ्रा-२ या योजनेतून २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यातूनच उरणमधील अनेक ठिकाणचे खांब, तारा तसेच ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात आले आहेत. तसेच भूमिगत विद्युत वाहिन्याही टाकण्यात आल्याने वीज खंडित होण्याच्या घटना कमी झाल्या आहेत.

प्रवीण साळी, अतिरिक्त अभियंता, महावितरण.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:43 am

Web Title: mahavitaran electricity pole
Next Stories
1 सिडको वसाहतीतील झाडांच्या छाटणीला विलंब
2 फुटबॉल सरावात सिडकोचा खो
3 ‘शीव-पनवेल’वरील खड्डय़ांमुळे वाहतूक पोलीस त्रस्त
Just Now!
X